CoronaVirus Lockdown News: ठाणे शहरात दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 01:09 AM2021-04-08T01:09:20+5:302021-04-08T01:09:45+5:30
मिनी लॉकडाऊन : व्यापारी, नागरिकांचाही मिळतोय प्रतिसाद
ठाणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारच्या वतीने मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर ठाणे महापालिकेनेदेखील आता शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सेवा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी करण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु, बुधवारी संपूर्ण ठाण्यातील अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व प्रकारचे व्यवहार बंद असल्याचे दिसून आले. तर इंदिरानगर भागात व्यापाऱ्यांनी हाताला निषेधाच्या काळ्या पट्टय़ा लावून आंदोलन केले.
वसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे ब्रेक द चेन करून राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन घेतला आहे. त्याचा परिणाम पहिल्या दिवशी ठाण्यात दिसून आला नाही. ठाण्यातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून याचा निषेध करून आंदोलन केले होते. मात्र, दुसऱ्या दिवसापासून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद असल्याचे दिसून आले. सर्वच दुकाने उघडण्यासाठी काही ठराविक वेळ मिळेल, या आशेवर व्यापारी असून लवकरच यावर तोडगा निघेल, असा दावा त्यांनी केला आहे. इंदिरानगर येथील व्यापाऱ्यांनी हाताला काळ्या पट्ट्या लावून निषेध आंदोलन केले.
टीएमटी किंवा इतर परिवहन सेवांनीही जेवढी आसने असतील तेवढ्या प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली होती. त्यामुळे इतर स्थानकांवर थांबलेल्या प्रवाशांची मात्र चांगलीच पंचाइत झाली. बसमध्ये एखादी सीट रिकामी असेल तर ती मिळविण्यासाठी बसथांब्यावर जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र अनेक बसथांब्यावर दिसत होते. गल्लीबोळातून दुकाने मात्र चोरी चोरी चुपके सुरू असल्याचेही चित्र काही ठिकाणी होते.
रस्त्यावर फिरणे टाळले
शहरातील वाहतुकीची वर्दळही कमी झाली आहे. स्टेशन परिसर, राम मारुती रोड, गोखले रोड, जांभळीनाका येथील मार्केटमधील गर्दी बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसले. याशिवाय नागरिकांनीदेखील आता या मिनी लॉकडाऊनला समर्थन दिल्याचे दिसत होते. त्यांनीही रस्त्यावर फिरण्याचे टाळल्याचे दिसले.