CoronaVirus Lockdown News: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे फुल उत्पादक पुन्हा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:12 AM2021-04-09T00:12:03+5:302021-04-09T00:12:20+5:30
मार्केट बंदची शेतकऱ्यांना चिंता
- संजय नेवे/राहुल वाडेकर
विक्रमगड : गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे रात्रीत होत्याचे नव्हते झाले. संचारबंदी लागू झाल्याने अनेकांचे हाल होऊन सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. त्यात फुलशेती पूर्णपणे संपुष्टात आली. विक्रमगड तालुक्यातील मोगरा उत्पादित करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले होते. या वर्षी जोमाने पुन्हा फुलशेतीतून उत्पादन काढण्याच्या तयारीत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नसले तरी ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध आणले आहेत.
तालुक्यातून मोगरा, सोनचाफा ८० टक्के दादर फुलमार्केट तर २० टक्के नाशिक फुल मार्केटला जात असतो. त्यात ऐन लग्नसराईच्या काळात दादर व नाशिक येथील व्यापाऱ्यांनी तीन दिवस फुले आणू नये, अशा सूचना दिल्याने येथील फुल उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.
खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी, उपराले, देहर्जा अशा अनेक गावात मोगरा व सोनचाफा लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मोगऱ्याचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पन्न अनेकांना मिळते, ज्यात प्रतिकिलो २०० ते ४०० इतका दर मिळत असतो. तालुक्यातून रोज अंदाजे दोन टन फुले दादर व नाशिक फुलमार्केटला जात असतात, तर सोनचाफा रोज २५ ते ३५ हजार फुले रोज दादर व इतर फुल मार्केटला जात असतात. सोनचाफाचा बाजारभाव सध्या शेकडा ६५ रुपये असा आहे.
दादर व नाशिक या ठिकाणी मोगऱ्याला मागणी असून मोगऱ्यामुळे आदिवासी लोकांच्या जीवनात सुगंध दरवळला होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोगरा दारात लावल्याने स्थलांतर थांबले. ज्यामुळे आदिवासी माणूस स्थिरावला होता. त्याचबरोबर या मोगऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाब आणि सोनचाफ्याची देखील लागवड करण्यात आली आहे. त्यापासून देखील चांगले उत्पन्न हे शेतकरी घेत होते. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या होणारी कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्थिरावली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने फुलशेतीवर गदा येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे व लॉकडाऊनमुळे फुलशेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले. तालुक्यातील विविध गावात मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडू, कागडा फुलाचे उत्पादन शेतकरी घेतात. विक्रमगड तालुक्यातून ही फुले दादर, कल्याण, सुरत, नासिक, पालघर बाजारपेठेत पाठवली जातात. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे तालुक्यातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वर्षी पुन्हा कडक निर्बंध लादल्याने दादर व नाशिक येथील व्यापाऱ्यांनी तीन दिवस फुले आणू नयेत असे सांगण्यात आल्याने उत्पादन झालेल्या फुलांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे.
- शिवम मेहता, मोगरा व सोनचाफा उत्पादक शेतकरी