CoronaVirus Lockdown News: शेवटच्या क्षणी दुकानदारांची धावपळ अन् नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 01:16 AM2021-04-06T01:16:31+5:302021-04-06T01:16:52+5:30

निर्बंधांची अंमलबजावणी सुरू : रात्रीपर्यंत ठाणे मार्केट गजबजलेलेच

CoronaVirus Lockdown News: Shopkeepers rush at the last minute | CoronaVirus Lockdown News: शेवटच्या क्षणी दुकानदारांची धावपळ अन् नागरिकांची गर्दी

CoronaVirus Lockdown News: शेवटच्या क्षणी दुकानदारांची धावपळ अन् नागरिकांची गर्दी

Next

- स्नेहा पावसकर

ठाणे : पोलिसांकडून मेगाफोनद्वारे दुकाने बंद करण्यासाठी होणारे आवाहन, तर काही दुकानांत थेट जाऊन केल्या जाणाऱ्या सूचना, त्यातही नागरिकांची उरलेसुरले काही खरेदी करण्यासाठीची धावपळ आणि संचारबंदीमुळे रात्री ८ पूर्वीच घराकडे घाईघाईने निघालेल्या नोकरदारांची रस्त्यावर लगबग, असे चित्र सोमवारी सायंकाळी ७ च्यानंतर ठाण्यातील प्रमुख रस्त्यांवर पाहायला मिळाले. 

राज्य सरकारने सोमवारी रात्री ८ नंतर कडक निर्बंध लागू करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार सोमवारी सायंकाळी साधारण ७.३० नंतर ठाणे मार्केट आणि गर्दीच्या परिसरात पोलीस दुकाने, कार्यालये बंद करण्याचे तसेच नागरिकांना विनाकारण न फिरण्याबाबत जाहीर आवाहन करत होते. रस्त्यावरील फेरीवाल्यांनी आधीच आपले बस्तान गुंडाळले होते. तर दुकानदारांची मात्र काहीशी धावपळ झाली. मात्र, काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होते.

कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या पाहता कधीही लॉकडाऊन होऊ शकेल, या विचाराने सामान्य ठाणेकर सोमवारी सकाळीच अन्नधान्य, किराणा सामान खरेदीसाठी घराबाहेर पडलेले दिसले. तर मार्केट, शॉपिंग प्लाझा या ठिकाणीही मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

मागच्या वर्षी याच महिन्यात कडक लॉकडाऊन होता. अगदी काही तासांसाठी तिही ठराविक भागातील दुकाने सुरू राहायची. त्यामुळे अन्नधान्य, खाण्याच्या वस्तूही विकत, प्रसंगी जास्त पैसे देऊन तरी मिळतात का, त्यासाठी ठिकठिकाणी फिरायला लागायचे. तिथे जाताना वाटेत पाेलीस अडवणूक करायचे. आणि इतके करूनही हवी असलेली वस्तू मिळायचीच असे नाही. कारण त्यादरम्यान सगळ्याचा तुटवडा होता. शॉपिंग प्लाझामध्ये जायचे म्हटले तर तासन् तास रांगेत उभे राहावे लागायचे. हे कटू अनुभव अनेकांनी घेतलेले आहेत. 

आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना सरकारने कडक निर्बंध घातले आहेत, तर नागरिकांनी निर्बंधांचे पालन केले नाही तर कारवाई करण्याबरोबरच लॉकडाऊनचे संकेतही यापूर्वीच दिले आहेत. आणि दररोज वाढते रुग्ण पाहता कधीही लॉकडाऊन जाहिर होईल, अशी भीती आणि चर्चा ठाणेकरांमध्ये रविवारपासूनच होती. तर, सोमवारी सायंकाळी पोलिसांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. 

दुकानांमध्ये खरेदीसाठी सकाळपासूनच रांगा
सरकार पहिले काही दिवस निर्बंध घालून पाहील आणि मग लॉकडाऊन लावेल, अशी भीती नागरिकांत दिसते आहे. आणि या भीतीमुळेच सोमवारी सकाळी सामान्य ठाणेकर किराणा वस्तू, खाद्यपदार्थ, भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. ठाणे मार्केट परिसर, शहरातील विविध शॉपिंग बाझार येथे सकाळपासून गर्दी झालेली पाहायला मिळाली. साठवण करण्याच्या दृष्टीने ठाणेकर सामान खरेदी करत होते. ‘लॉकडाऊन झाले तर मग कुठे धावपळ करायची, अशी चर्चा त्यांच्यामध्ये ऐकायला मिळत होती.

Web Title: CoronaVirus Lockdown News: Shopkeepers rush at the last minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.