CoronaVirus Lockdown News: ...तर बदलापुरातील दुकाने सोमवारपासून होणार सुरू; व्यापाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:57 PM2021-04-08T23:57:26+5:302021-04-08T23:57:42+5:30
: नुकसानभरपाई द्या, मग टाळेबंदी करा
बदलापूरः राज्य शासनाने लागू केलेली टाळेबंदी अन्यायकारक असून आम्हाला दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या. अन्यथा आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, त्यानंतर हवे तितके दिवस टाळेबंदी करावी, अशी मागणी करून गुरुवारी बदलापूर आणि अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकान सुरू आंदोलन करण्याचा इशारा गुरुवारी दिला. या मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून दुकाने उघडली जातील. त्यानंतर कोणताही गुन्हे दाखल केले तरी आम्हाला फरक पडणार नाही, असेही व्यापारी संघटनांनी जाहीर केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्य शासनाने लागू केलेली अंशतः टाळेबंदीवरून व्यापारीवर्गात असंतोष पसरला आहे. त्याचा फटका व्यापारीवर्गाला बसत असून त्याविरुद्ध पहिल्या दिवसापासूनच व्यापारी संघटना, दुकानदार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गेल्या आठवड्यात लागू केलेल्या संचारबंदीच्या नियमात पोलिसांच्या आवाहनावरून व्यापाऱ्यांनी रात्री आठनंतर कोणतीही सूचना नसताना दुकाने बंद करून सहकार्य केले. मात्र, व्यापाऱ्यांना गृहीत धरून राज्य शासनाने पुन्हा अंशतःच्या नावाखाली पूर्णतः टाळेबंदी केल्याचा निषेध म्हणून गुरुवारी बदलापुरातील बाजारपेठ व्यापारी जनसेवक मित्र मंडळाने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले. सकाळी अकरा वाजल्यापासून सर्व दुकानदार राज्य शासनाच्या निषेधाचे फलक घेऊन आपल्या बंद दुकानाबाहेर उभे होते. यावेळी कोणतीही घोषणाबाजी न करता टाळेबंदीला विरोध केला. शासनाने टाळेबंदीतील आमच्या नुकसानीचा पंचनामा करून आम्हाला मदत जाहीर करावी, यापुढे प्रतिमाह ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन हवे तेवढे दिवस टाळेबंदी करावी, अशी आमची मागणी असल्याचे बाजारपेठ व्यापारी जनसेवक मित्र मंडळाचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी सांगितले.
राज्य शासनाने दुकानांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आम्ही सोमवारपासून आमची दुकाने सुरू करणार आहोत. दुकान बंद असल्याने असेही आमचे नुकसान होत असून गुन्हे दाखल केल्यानंतर आणखी किती नुकसान होईल, अशीही भूमिका व्यापाऱ्यांनी जाहीर केली आहे.
अंबरनाथमध्ये व्यापाऱ्यांचे आंदोलन, ‘लॉकडाऊन हटाव, व्यापार बचाव’चे झळकवले फलक
अंबरनाथ : सोमवारपासून राज्यासह अंबरनाथमध्ये मिनी लॉकडाऊन लागू झाल्यामुळे व्यापारी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व्यापारीवर्गावर लावलेले निर्बंध वेळीच हटवले नाहीत तर नाईलाजाने दुकाने उघडण्याचा इशारा अंबरनाथ शहर व्यापारी संघटनेने शासनाला दिला आहे.
मिनी लॉकडाऊनमुळे लावलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ गुरुवारी अंबरनाथ व्यापारी महासंघातर्फे संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेस्थानक परिसरात पूर्व आणि पश्चिम भागात व्यापारी बांधवांनी मानवी साखळी करून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.
मिनी लॉकडाऊनमध्ये शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद राहतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, नव्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गात संभ्रमावस्था निर्माण केली गेली. यावेळी लॉकडाऊन हटाव, व्यापार बचाव, व्यापाऱ्यांना लॉकडाऊन मंजूर नाही अशा घोषणा देणारे फलक हातात घेतले होते.