CoronaVirus Lockdown News: भाजी विकून ठाण्यातील ज्वेलर्सचं अनोखं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 12:49 AM2021-04-10T00:49:13+5:302021-04-10T07:26:27+5:30
CoronaVirus Lockdown News: दुकाने सुरू करण्यासाठी ताेडगा काढण्याची मागणी
ठाणे : प्रशासनाला जाग यावी, यासाठी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी जांभळीनाका परिसरातील ज्वेलर्सनी चक्क बंद दुकानाबाहेर भाजी विकून अनोखे आंदोलन केले. प्रशासनाने यावर तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे, तर ठाणे महापालिकेनेदेखील शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे व्यापारी अधिकच संतप्त झाला आहे. दुकाने बंद ठेवली तर खायचे काय, असा सवाल त्यांनी केला आहे. व्यापाऱ्यांपाठोपाठ गुरुवारी हॉटेल व्यावसायिकांनीदेखील रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यानंतर आता शुक्रवारी ठाण्यातील ज्वेलर्सनी सरकाराला जाग यावी, या उद्देशाने रस्त्यावर उतरून चक्क बंद दुकानांसमोर रस्त्यावर बसून भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केल्याचे दिसून आले. आमच्याही पोटाला भूक आहे, आमच्या घरीदेखील बायका-मुले आहेत, त्यांचे पोट भरण्यासाठी काही ना काही केलेच पाहिजे, शासन अद्याप यावर काहीच तोडगा काढत नाही, त्यामुळेच आम्ही भाजी विकण्याचा मार्ग पत्करला असल्याचे मत यावेळी ज्वेलर्सनी व्यक्त केले.
दुकाने उघडण्यासंदर्भात लवकरात लवकर मार्ग काढावा, या उद्देशाने तसेच सरकारला जाग यावी, हा या आंदोलनामागचा हेतू आहे. त्यामुळेच आम्ही भाजी विकण्याचा पर्याय निवडला.
- कमलेश जैन, अध्यक्ष, ठाणे ज्वेलर्स असोसिएशन
दुकानांवर इतर कर्मचाऱ्यांचेही पोट अवलंबून आहे. त्यांचा पगार हा आम्हाला द्यावाच लागणार आहे. लाईट बिल भरावेच लागणार आहे. परंतु, दुकाने बंद असतील हे सर्व कसे करायचे, असा सवाल त्यांनी केला.