CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनविरोधात व्यापारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 12:51 AM2021-04-07T00:51:36+5:302021-04-07T00:51:46+5:30

ठाण्यातील नौपाडा परिसरात रस्त्यावर निषेध : निर्बंध शिथिल करण्याची मागणी

CoronaVirus Lockdown News: Traders rally against mini lockdown | CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनविरोधात व्यापारी एकवटले

CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनविरोधात व्यापारी एकवटले

Next

ठाणे : राज्य शासनाच्या वतीने केवळ शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले असतानाच सोमवारी अचानक ठाणे महापालिकेने संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील व्यापाऱ्यांनी तसेच नौपाडा भागातील व्यापाऱ्यांनी याचा निषेध करून रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तसेच निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.  अनलॉक नंतर सर्व व्यवहार मूळपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाने जोरदार धडक देऊन सर्व व्यवहार ठप्प केले. आमच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला असून आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे मत ठाण्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केले. मुख्यमंत्री एक सांगतात आणि स्थानिक प्रशासन वेगळेच करतात याचा अर्थ काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे. सरकारने आखून दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करायला तयार असताना आमच्यावरच हा अन्याय का, असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक शहरांमध्ये जसे व्यापारी संघटनांनी विरोधात बंड पुकारले आहे. तसाच विचार सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या डोक्यात घोळत असल्याने येत्या काळात तोडगा निघाला नाही तर कठोर पाऊल उचलू, असा इशाराही व्यापाऱ्यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, या संदर्भात आखलेले निर्बंध शिथिल करावेत, किंवा सम-विषमनुसार बाजारपेठ खुली करावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली. किंवा वेळा ठरवून त्यानुसार दुकाने उघडी ठेवण्यास त्यांनी परवानगी मागितली आहे.

डोंबिवलीमध्ये व्यापाऱ्यांनी केली मानवी साखळी 
डोंबिवली : मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना प्रशासनाने दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याने डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्वेत आणि पश्चिमेत व्यापाऱ्यांनी मानवी साखळी करून आपला निषेध नोंदवला.

पूर्वेतील उर्सेकरवाडी येथील व्यापारी मंगळवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान रस्त्यावर उतरले. तेथे त्यांनी दुकानासमोर मानवी साखळी करून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे दुकानातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शासन बोलते एक आणि करते एक असे सांगून त्यांनी नाराजी दर्शवली. रामनगर पोलीस यावेळी उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी कोणतीही घोषणाबाजी तसेच नियमांचे उल्लंघन केले नसल्याने कारवाई केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पश्चिमेतील गुप्ते रोडवरही मंगळवारी व्यापाऱ्यांनी दुकान बंदच्या आदेशाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून मानवी साखळी आंदोलन केले. सायंकाळी ५ वाजता व्यापारी रस्त्यावर उतरले होते. या निर्णयामुळे आमच्यासह दुकानातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.  दरम्यान, आंदोलनाच्या वेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे आंदोलन सुरू असताना पोलीस घटनास्थळी उपस्थित नव्हते.

भिवंडीत रस्त्यावर दाढी करून सलून व्यावसायिकांचा विरोध; लॉकडाऊन लादल्याने राज्य शासनाचा केला निषेध 
भिवंडी : गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे सर्व व्यावसायिकांची अर्थव्यवस्था धुळीस मिळाली असताना पुन्हा दुसऱ्या कोरोना लाटेत लॉकडाऊन सदृश परिस्थिती 
राज्यशासनाने निर्माण केली आहे. त्यामध्ये सलून व्यावसायिकांना मनाई करण्यात आली आहे. त्या निषेधार्थ ते रस्त्यावर उतरून निषेध नोंदवित आहेत. 
भिवंडीत मंगळवारी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव, राष्ट्रीय सरचिटणीस महेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोंबडपाडा येथे सलून दुकाने बंद ठेवून दुकानांबाहेर प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांची दाढी करून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. गेल्या लॉकडाऊनमध्ये २१ सलून 
व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. 
त्यानंतर आता पुन्हा सलून व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या समाजाला देशोधडीला लावण्याचा प्रकार राज्य शासन करीत आहे. या निर्णयाचा राष्ट्रीय नाभिक संघटनेने निषेध केला आहे. मंगळवारी भिवंडी शहरातील सलून दुकानांबाहेर दंडावर काळ्या फिती लावून रस्त्यावर नागरिकांची दाढी करून निषेध नोंदवण्यात आला. 
राज्य शासनाने दोन दिवसांत सलूनबाबत निर्णय बदलला नाही तर निदर्शने करण्याचा इशारा राष्ट्रीय सचिव महेंद्र जाधव यांनी दिला. या निषेध आंदोलनात प्रदेश सचिव तुषार भोईर, कोकण विभाग संपर्कप्रमुख भालचंद्र मोरे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आबा बिरारी, कोकण विभाग महिला अध्यक्ष सोनाली चव्हाण यांसह दुकानदार सहभागी झाले होते.

Web Title: CoronaVirus Lockdown News: Traders rally against mini lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.