CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनविरोधात ठाणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये उसळली संतापाची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:34 AM2021-04-07T01:34:38+5:302021-04-07T06:56:29+5:30
शिथिलता देण्याची मागणी; अनेक ठिकाणी निर्बंधांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम
ठाणे : सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुकाने सुरू राहतील, असा व्यापाऱ्यांचा समज होता, परंतु अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने सोमवार रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील, असा आदेश जिल्ह्यातील सर्व महापालिकांसह जिल्हा प्रशासनाने काढल्याने, त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी ठाणे, कल्याण-डाेंबिवली, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदरसह उल्हासनगर आणि ग्रामीण भागात उमटले.
नव्या निर्बंधाबाबत व्यापाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. नव्या नियमांची माहिती प्रशासनाकडून वेळेत आमच्यापर्यंत पोहोचली नाही, अशा तक्रारी करून सर्व ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सकाळी आपली दुकाने उघडी ठेवली. मात्र, दहा अकरा वाजल्यानंतर पोलिसांनी गस्त घालून उद्घोषणा देऊन दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी सरसकट दुकाने बंद न ठेवता, नियमात शिथिलता देण्याची मागणी केली. यात सलून व्यावसायिक जास्तच आक्रमक दिसून आले. भिवंडीत त्यांनी सलून दुकाने बंद ठेवून दुकानांबाहेर स्वरूपात नागरिकांची दाढी करून शासनाचा निषेध नोंदविला. ठाण्यात भाजपा आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळास घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शिथिलता देण्याची मागणी केली.
नवी मुंबईमध्ये नागरिकांमध्ये संभ्रम
नवी मुंबई: शासनाने लागू केलेल्या निर्बंधाविषयी नवी मुंबईमधील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निर्बंधाविषयी पूर्ण माहिती नसल्याने मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरीक्त इतर दुकाने ही सुरूच होती. महानगरपालिका व पोलीस पथकांनी शहरात फिरून व्यावसायिकांना दुकाने बंद करायला लावली. परंतु अनेक ठिकाणी पोलीस पथके गेल्यानंतर पुन्हा दुकाने सुरू केली जात होती. प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. परंतु व्यापाऱ्यांनी सरसकट दुकाने बंद करू नये, अशी मागणी केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यवहार दिवसभर सुरळीत सुरू होते. बाजार समिती मध्ये गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नवीन नियमावली लागू केली असून मार्केट निहाय सर्वांची कोरोना चाचणी सुरू केली आहे.
दंडात्मक कारवाईमुळे पालघरमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा
पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून दुकानदार, व्यापारी तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. मंगळवारी सकाळी दुकाने उघडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला गेला. वसईतील नालासोपारा शहरात तर व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात मोर्चा काढून निषेध केला. आधीच्या लाॅकडाऊनमध्ये व्यापारी, दुकानदार. व्यावसायिकांचे आधीच कंबरडे मोडले असताना जव्हार शहरात प्रति व्यापारी १० हजार रुपये दंड आकारण्यात आला. या दंडात्मक कारवाईमुळे व्यापारी संतप्त झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात पाेलिसांच्या मदतीने बाजारपेठा केल्या बंद
रायगड : जिल्ह्यातील नागरिकांना लाॅकडाऊनमध्ये काय सुरू राहणार याची माहिती नसल्याने साेमवारी आणि मंगळवारी दुपारपर्यंत बाजारपेठा सुरू हाेत्या, मात्र प्रशासनाने पाेलिसांच्या मदतीने कडक अंमलबजावणीला सुरुवात केल्याने बाजारपेठांमधील दुकाने पटापट बंद झाली.
काेराेनाच्या वाढत्या संसर्गाला राेखण्यासाठी सरकारने मिनी लाॅकडाऊन जाहीर केला, मात्र या कालावधीमध्ये बाजारपेठा सुरू राहणार असल्याचा समज व्यापारी आणि व्यावसायिकांचा झाला. त्यामुळे बाजारपेठा सुरूच हाेत्या. सरकारने नेमका काेणता निर्णय जाहीर केला हे सांगण्यात जिल्हा प्रशासन कमी पडल्याचेच यावरून दिसून आले. दुकाने बंद राहणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता यांनी जाहीर केल्याने त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेत पाेलिसांच्या मदतीने बाजारपेठा बंद केल्या. आज सर्वांना पूर्वसूचना देण्यात येत आहे. मात्र बुधवारी दुकाने, प्रार्थना-धार्मिक स्थळे सुरू राहिल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाेलिसांनी दिला.