Coronavirus: ठाण्यात लॉकडाऊनचे निर्बंध झाले शिथिल, असे आहेत नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:11 AM2021-08-04T09:11:26+5:302021-08-04T09:14:47+5:30

Coronavirus in Thane: राज्य शासनाने ११ जिल्हे वगळता इतर ठिकाणी ब्रेक द चेनचे नियम लागू केल्यानंतर मंगळवारी ठाणे महापालिकेनेही नवी नियमावली जाहीर केली.

Coronavirus: Lockdown restrictions relaxed in Thane | Coronavirus: ठाण्यात लॉकडाऊनचे निर्बंध झाले शिथिल, असे आहेत नवे नियम

Coronavirus: ठाण्यात लॉकडाऊनचे निर्बंध झाले शिथिल, असे आहेत नवे नियम

googlenewsNext

ठाणे : राज्य शासनाने ११ जिल्हे वगळता इतर ठिकाणी ब्रेक द चेनचे नियम लागू केल्यानंतर मंगळवारी ठाणे महापालिकेनेही नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार आता ठाणे महापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवांसह इतर दुकानेही रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद असणार आहेत. मॉल्स सुरू करण्याला ठाण्यातही परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात इतरत्रही असेच निर्बंध शिथिल करण्यात आले असून, तसे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी जारी केले आहेत.
काय सुरू राहील...
अत्यावश्यक सेवांसह इतर दुकानेही सोमवार ते शनिवार रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. मेडिकल, केमिस्ट शॉप सुरू राहणार. ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार. हॉटेलमधील पार्सल सेवा नियमित सुरू राहणार. व्यायामशाळा, केशकर्तनालये, योग वर्ग, स्पा, ब्युटीपार्लर ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शनिवार तसेच सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरू राहतील. शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू. चित्रीकरण नियमित वेळेनुसार सुरू राहणार. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा. अंत्यविधीसाठी २० नागरिक, लग्नसोहळे ५० नागरिकांच्या उपस्थितीत, सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू, मात्र उभे राहून प्रवास करण्यास बंदी. जलतरण तलाव आणि जवळून संपर्क येईल असे क्रीडा प्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळांस यापूर्वी नियमित केलेल्या वेळेनुसार परवानगी असेल.
काय बंद राहील...
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने रविवारी पूर्ण वेळ बंद राहणार. रविवारी हॉटेल्स बंद राहणार. व्यायामशाळा, केशकर्तनालये, योग वर्ग, स्पा, ब्युटी पार्लर रविवारी बंद राहणार. धार्मिक स्थळे, लोकल प्रवास बंद राहणार आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे व मल्टिप्लेक्स बंद राहणार. निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि विनाकारण फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

आदेश येताच पुन्हा शटर ओपन
राज्य शासनाकडून ठाण्यासह जिल्ह्याचे चित्र स्पष्ट करण्यात आले होते. तरीदेखील त्याची अंमलबजावणी कशी करावी, याचे अधिकार स्थानिक संस्थांना देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतरच ठाण्यासह इतर भागांचे चित्र स्पष्ट होणार होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी ४ नंतर ठाण्यातील अत्यावश्यक सेवेतील वगळून इतर दुकाने बंद होती. परंतु आदेश येताच ठाण्यातील सर्वच दुकाने पुन्हा सुरू करण्यात आल्याचे चित्र दिसून आले. 

मुंबईत रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी
मुंबई : ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत महापालिकेने सोमवारी निर्बंधांमध्ये शिथिलता आणली. त्यानुसार सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मॉल्स सुरू ठेवण्यास अद्यापही बंदी कायम असेल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे, तसेच रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी, तर रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.
मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे, तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधांत मंगळवारपासून शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र, लोकल सेवा, खासगी कार्यालये, मॉल, चित्रपटगृह यामध्ये कोणतीही शिथिलता आणलेली नाही.

Web Title: Coronavirus: Lockdown restrictions relaxed in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.