CoronaVirus Lockdown : ठाणे जिल्ह्यात कडकडीत बंद, नागरिकांचा वीकेंड घरीच, शहरे लाॅकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:34 AM2021-04-11T00:34:44+5:302021-04-11T00:37:48+5:30
CoronaVirus Lockdown : विविध शहरांमध्ये नाक्यानाक्यावर पाेलिसांचा कडक बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. प्रत्येक वाहनांची तपासणी करूनच त्यांना पुढे जाऊ दिले जात हाेते.
ठाणे : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी राज्य सरकारने शनिवार आणि रविवारी लागू केलेल्या वीकेंड लाॅकडाऊनला शनिवारी जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे, कल्याण-डाेंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर या शहरी आणि शहापूर, मुरबाड या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध शहरांमध्ये नाक्यानाक्यावर पाेलिसांचा कडक बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. प्रत्येक वाहनांची तपासणी करूनच त्यांना पुढे जाऊ दिले जात हाेते. काही ठिकाणी विनाकारण हिंडणाऱ्यांना पाेलिसांनी हुसकावून लावले. त्यामुळे उगीचच पाेलिसांच्या कचाट्यात सापडू नये यासाठी नागरिकांनी घरात बसणे पसंत केल्याने एरवी गजबलेले रस्ते, बाजारपेठा ओस पडल्या हाेत्या.
ठाणे शहरात रस्ते, बाजारपेठांमध्ये सर्वत्र सन्नाटा
ठाणे : वीकेंड लॉकडॉऊनच्या निमित्ताने शनिवारी ठाणे शहरात कडकडीत बंद पाळला गेला. मेडिकल वगळता इतर सर्व सेवा बंद होत्या. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची पोलिसांकडून चांगलीच कानउघाडणी केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्तीची कारवाईदेखील पोलिसांनी केली. तर अत्यावश्यक सेवा वगळता म्हणजेच, मेडिकल दुकाने वगळता इतर सर्वच व्यवहार बंद होते. स्टेशन व जांभळीनाका परिसर येथील मुख्य बाजारपेठेतदेखील शुकशुकाट होता.
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीने वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी ठाण्यातही कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. ठाण्यातील सर्वात गर्दीचे ठिकाण म्हणजे, जांभळीनाका येथील मार्केट परिसरात पूर्णपणे शुकशुकाट होता. येथील मेडिकल सेवा वगळता इतर दुकाने, भाजीमार्केट, किराणा मालाची दुकानेदेखील बंद होती. तसेच येथील सर्व मार्केट परिसर बंद ठेवले होते. स्टेशन रोड परिसरात असलेले सर्व दुकाने बंद होती. मुख्य भाजीमंडई बंद होती. तर धान्य मार्केटदेखील बंद होते. पोलिसांनी बॅरीकेडस लावून रस्ते बंद केले होते. स्टेशन परिसर, टॉवरनाका, कोर्टनाका, महागिरी, खारकर आळी, कडकडीत बंद होता. याठिकाणी पोलिसांचा वॉच होता. पोलिसांच्या तीन टीम तीन पॉईंटवर ठेवल्या होत्या. जांभळीनाका, कोर्टनाका, खारकर आळीला प्रत्येकी १५ पोलिसांची टीम तैनात होती. ठाण्यातील रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळला. रस्त्यावरील वाहनांची वर्दळही कमी असल्याचे दिसून आले. ठाणेकरांनी वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत होते.
तलावपाळी, चिंतामणी चौक सारखा परिसर शांत होता. पोलिसांनी नाकाबंदी केली होती.
कल्याणमध्ये बंदला मिळाला चांगला प्रतिसाद
कल्याण : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला शनिवारी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. मोकाट फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी हाेत आहे की नाही यासाठी पोलीस सकाळपासूनच वाहने तपासत हाेते. कल्याण रेल्वेस्थानक परिसरात टॅक्सी रिक्षाचालकांची कसून तपासणी केली. अत्यावश्यक कामासाठी बाहेर न पडलेल्या वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. कारवाईची तीव्रता वाढता स्टेशन परिसर तासाभरात मोकळा झाला होता. सकाळी १० वाजल्यापासून कडकडीत बंदचा परिमाण दिसू लागला. मेडिकल स्टोअर, रुग्णालयात जाणारे नागरिक दिसून येत होते. पालिकेने आज आणि उद्या लसीकरण बंद ठेवले होते. पाठारे नर्सरी जवळील आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते. लसीकरण केंद्रावर पोहाेचण्यासाठी नागरिकांनी कडकडीत उन्हात पायपीट करीत केंद्र गाठावे लागले. नाक्यानाक्यावर पोलीस तैनात होते. मोकाट फिरणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात होती. रस्त्यावर एक दोन रिक्षाच धावताना दिसल्या.
मुंब्य्रात वीकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद
मुंब्राः वीकेंड लॉकडाऊनला पहिल्या दिवशी मुंब्य्रात १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील रेल्वेस्थानक परिसर तसेच स्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठ, आनंद कोळीवाडा, नारायणनगर, संजयनगर, ठाकुरपाडा, रेतीबंदर, अमृतनगर, गुलाब पार्क बाजारपेठ, कौसा, रशीद कंपाउंड, चर्णी पाडा आदी भागातील सर्वच प्रकारच्या व्यापारी तसेच भाजी व फळविक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवले होते.
नागरी वसाहतीमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर तुरळक वाहने धावत होती. प्रवासी संख्या कमी असल्यामुळे बहुतांशी रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा बंद ठेवल्या होत्या. यामुळे रेल्वेस्थानकाजवळील रिक्षाथांब्यावर तुरळक रिक्षा दिसत होत्या. बाजारपेठा बंद असल्यामुळे रस्त्यावर संध्याकाळी तरुण क्रिकेट खेळताना दिसत होते.
रिक्षाचालकांचा पाेलिसांशी वाद
उल्हासनगर : व्यापाऱ्यांचा विरोध असतानाही शहरात वीकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. काही ठिकाणी दुचाकीस्वार, रिक्षाचालक व पोलिसांत नियमांचे उल्लंघन केल्यावरून वाद झाला. तर दुसरीकडे सफाई कामगार, पोस्टमन, गॅस वितरणचे काम नियमित सुरू होते.
शहाड फाटक परिसर, बिर्ला गेट चौक, शहाड, उल्हासनगर व विठ्ठलवाडी पोलीस ठाणे रेल्वे स्टेशन, गोलमैदान, शिवाजी चौक, १७ सेक्शन चौक, श्रीराम व पवई चौक, नेहरू चौक, व्हीनस चौकसह मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक वृद्ध ऐन दुपारी हातात जेवण घेऊन जात असताना चक्कर येऊन रस्त्यावर पडला. नागरिक व पोलीस त्याच्या मदतीला धावले.
भिवंडीत व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भिवंडी : शहरात वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी शनिवारी शुकशुकाट दिसला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून, तर नागरिकांनी घराबाहेर न पडता या वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद दिला.
भिवंडी शहरातदेखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मनपा प्रशासनासह वीकेंड लॉकडाऊनसाठी पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील धामणकरनाका, जकातनाका, वंजारपट्टीनाका, अंजुरफाटा, छ. शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, मंडई या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट होता, तर शहरातील मुख्य रस्त्यांवर पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची चौकशी करण्यात येत होती. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींकडून ओळखपत्राची खात्री करूनच त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्याची मुभा देण्यात येत होती.
अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी वगळता अती आवश्यक कामासाठी नागरिकांनी शहरात प्रवेश करावा, अन्यथा विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली.
टिटवाळ्यात रस्ते झाले निर्जन
टिटवाळा : शहरात वीकेंड लाॅकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळपासूनच सर्व रस्ते निर्जन दिसत हाेते. मेडिकल, दवाखाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे एरव्ही गजबजलेल्या या परिसरात सर्वत्र शुकशुकाट हाेता. लाॅकडाऊनला गालबाेट लागू नये, यासाठी नाक्यानाक्यांवर तसेच साेसायट्या, चाैक आणि मंदिर परिसरात पाेलीस अधिकारी व हाेमगार्ड गस्त घालत हाेते.
वीकेंड लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा आणि अतिमहत्त्वाच्या कामानिमित्तच घराबाहेर पडणाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पाेलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची चाैकशी, कागदपत्रे तपासून आणि वाहनांची तपासणी करूनच त्यांना पुढे साेडण्यात येत हाेते.