CoronaVirus: रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्यानं मजुरांच्या अपेक्षा पल्लवित; पण मार्ग सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:45 PM2020-05-02T14:45:01+5:302020-05-02T14:47:18+5:30

योग्य माहिती मिळत नसल्याने कामगार गोंधळात

CoronaVirus lockdown workers stranded in dombivali not getting proper information about trains | CoronaVirus: रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्यानं मजुरांच्या अपेक्षा पल्लवित; पण मार्ग सापडेना

CoronaVirus: रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्यानं मजुरांच्या अपेक्षा पल्लवित; पण मार्ग सापडेना

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली: देशभरातील लॉकडाऊन केंद्र सरकारने वाढवला असल्याने ठिकठिकाणी अडकलेल्या मजूर, कामगारांच्या गावी जाण्याच्या अपेक्षेवर सपशेल पाणी फिरले आहे. काहिही करा आणि आम्हाला आमच्या मूळ गावी सोडा अशी विनंती ते पोलीस, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीना करत आहेत. नाशिक येथून रेल्वे सुटल्याची माहिती मिळताच शहरातील अनेक अडकलेले मजूर सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने पोलीस ठाणे, प्रशासन गाठून गावाला सोडण्याची विनंती केली. मात्र यंत्रणेकडून नेमके मार्गदर्शन मिळत नसल्याने कामगारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

शहरात आयरे गाव, शेलार नाका, पाथरली, आजदे, सोनारपाडा, तसेच नजीकच्या दावडी, गोळवली, सुचक नाका या सर्व ठिकाणी मजूर अडकेलेले आहेत. शेलार नाक्याजवळील कामगारांनी शनिवार। सकाळपासूनच गावाला जाण्यासाठी रांग लावत आम्हाला फॉर्म द्या, अशी विनवणी केली. त्यानुसार एका ठिकाणी जाणाऱ्या तेलंगणामधील 40 अडकलेल्या बिगारी काम करणाऱ्या मजुरांनी फॉर्म मिळवून त्यावर नाव, फोन नंबर आणि आधार कार्ड नंबर लिहून तो पोलीस ठाण्यात देण्यासाठी प्रयत्न केले. फॉर्म भरण्यासाठी ते रामनगरला एकत्र आले. परंतु तेथे त्यांना पोलिसांनी हटकल्याने त्यांची पांगापांग झाली. अखेरीस सगळ्यांची नावे, मिळतील त्यांचे फोन नंबर, आधार सगळं नमूद केले. ते भरण्यासाठी त्यांना परिसरात असलेल्या दक्ष नागरिकांनी सहकार्य केले. मास्क लावा असे नागरिकांनी सांगितल्यावर रुमाल आहे चालतील का, असे म्हणत त्यांनी रुमाल तोंडाला बांधले.

अशाच प्रकारे पाथरली परिसरातही कामगार एकत्र आले असून त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु आमच्याकडे कोणताही फॉर्म नाही, महापालिकेशी संपर्क साधा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी नगरसेवक निलेश म्हात्रे याना संपर्क केला. त्यांनी त्याबाबाबत विचारणा करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना फोन केला. परंतु ते काम लोकप्रतिनिधी म्हणून करावे असे त्यांना सांगण्यात आल्याने रामनगरला फॉर्म घेत असून टिळकनगरला नाही असे का असा सवाल नगरसेवक म्हात्रे यांनी केला. त्यांनी त्याबाबत महापालिका सचिवानाही कॉल करून तोडगा काढण्यासाठी विनंती केली. त्यामुळे नेमके आदेश काय आहेत हे न समजल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण दिसून येत होते.

आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या, दीड महिना झाला हाताला काम नाही, काय करावे सुचत नाही. त्यामुळे आम्हाला तेलंगणा येथे जाऊ द्यावे. आम्ही 40 जण अडकले असून नगरसेवकाने किंवा महापालिकेने दिलेले किती दिवस खायचे, आता आमचे पैसेही संपत आले आहेत, आम्हाला घरी जाऊ द्या, बस, रेल्वे कशानेही जाऊ द्या. पोलीस ठाण्यात आम्ही फॉर्म भरून देत आहोत. - रेड्डीनायक चौहान

जे कामगार रेड झोन मध्ये नाहीत अशांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगारांची नोंद घेण्यात येत आहे, ते प्रभाग अधिकऱ्यांना दिले जाईल. त्यानंतर त्या कामगारांची मेडिकल होईल, त्यानंतर प्रमाणपत्र मिळेल आणि नंतर अंतिम निर्णय नोडल अधिकारी घेतील. - सुरेश आहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे.

Web Title: CoronaVirus lockdown workers stranded in dombivali not getting proper information about trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.