Coronavirus : कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झाली मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 02:11 AM2020-03-19T02:11:54+5:302020-03-19T02:12:27+5:30
ठाणे स्थानकातून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या दोन दिवसांत ८० ते ९० हजारांवरून ६१ हजारांवर आली आहे.
ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. या स्थानकातून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या दोन दिवसांत ८० ते ९० हजारांवरून ६१ हजारांवर आली आहे. ही संख्या घटल्याने रेल्वेच्या उत्पन्नावर पाच ते दहा लाखांचा परिणाम झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
ठाणे रेल्वेस्थानकात एकूण १० फलाट आहेत. त्यातील फलाट क्रमांक १ ते ६ वरून मध्य रेल्वेवरील तर ९ ते १० वरून ट्रान्स-हार्बर (वाशी-पनवेल), तर ७ ते ८ या फलाटांवरून एक्स्प्रेस आणि मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या अंदाजे ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेल सुमारे २८२ अप-डाउन लोकल, तसेच जवळपास ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. ठाणे रेल्वेस्थानकातून सरासरी ८० ते ९० हजार लोकल प्रवासी तिकीट घेतात. तिकीटविक्रीतून रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत ४० ते ५० लाखांचे उत्पन्न येते. मात्र, कोरोनामुळे सोमवारी सरासरी ६३ हजार तिकीटविक्री झाली. मंगळवारी ही संख्या दोन हजारांनी कमी होऊन ६१ हजारांवर येऊन थांबली आहे. या विक्रीतून ३० ते ३५ लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले. दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात. ती संख्या ३५ ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वातानुकूलित लोकलवर परिणाम
वातानुकूलित लोकलचे तिकीटदर जास्त असल्याने याची प्रवासीसंख्या कोरोनामुळे कमी झाली आहे. सरासरी १८ तिकीट घेऊन प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या चारने घटली आहे. मात्र, पासने प्रवास करणाऱ्यांची संख्या स्थिर आहे. ती संख्या पाच इतकी आहे.
ठाण्यात थर्मल यंत्राद्वारे तपासणी सुरू
ठाणे रेल्वेस्थानकात मध्य रेल्वेच्या वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून कोरोना तपासणी कक्ष सुरू केला आहे. या कक्षात थर्मल यंत्राद्वारे प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासले जाते. आजपर्यंत ठाणे स्थानकातील या कक्षात एकही प्रवासी संशयित आढळलेला नाही, असा दावा रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आला आहे. मंगळवारी सुरू केलेल्या या कक्षात बुधवारी दुपारपर्यंत ४०० हून अधिक नागरिकांनी फलाट क्रमांक २ येथे तपासणी केली असून, लवकरच आणखी एक थर्मल यंत्र येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.