CoronaVirus News : उल्हासनगर शासकीय बालसुधारगृहातील १४ मुलांना कोरोना, रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 01:49 PM2021-08-28T13:49:46+5:302021-08-28T13:56:08+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: उल्हासनगर कॅम्प नं-५ तहसील कार्यालया जवळील शासकीय बालसुधारगृह आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-५ येथील शासकीय बालसुधारगृहातील १४ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले असून १४ पैकी ३ मुलांवर कोविड रुग्णालय व ११ मुलांवर कोविड आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. बालगृहातील इतर मुलांची कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ राजा रिजवानी यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ तहसील कार्यालया जवळील शासकीय बालसुधारगृह आहे. यामध्ये एकून २५ मुले असून त्यामधील १४ जणांना गुरवारी व शुक्रवारी ताप, खोकला व उलट्या सुरू झाला. बालगृहाच्या संबंधित डॉक्टरांना कोरोना संसर्गाचा संशय आला. त्यांनी मुलांना मध्यवर्ती रुग्णालयात नेऊन, त्यांची अँटीजेंटस टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये १४ मुलांची टेस्ट पॉजिटिव्ह आल्यावर, त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले. १४ पैकी ३ मुलावर कॅम्प नं-४ येथील कोविड रुग्णालय तर ११ मुलावर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या कोविड आरोग्य केंद्रात उपचार सुरू केले. केंद्राच्या प्रमुख डॉ मोनिका जाधव यांनी सर्व मुलांच्या तब्येती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. महापालिका आरोग्य विभागाने शासकीय बालसुधारगृहाच्या इमारतीचे सॅनिटाईज करून, निगेटिव्ह टेस्ट आलेल्या मुलावर डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले.
शहरातील शासकीय बालसुधारगृह तहसील कार्यालय शेजारी असून बालगृहाच्या बाजूला तहसील कार्यालयाच्या नवीन इमारती मध्ये महापालिकेचे कोविड आरोग्य सेंटर आहे. या कोविड आरोग्य सेंटर मध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णावर येथे उपचार केले जातात. याच परिसरात बालगृहातील मुलांची वर्दळ अथवा जाणे-येणे असल्याचे बोलले जाते. कदाचित यातून मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असे म्हटले जाते. याप्रकारने शाळा सुरू करण्यावर व शासकीय बालसुधारगृहात राहणाऱ्या मुलांच्या आरोग्य विषयी प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. शहरात विविध वयोगटातील बालसुधारगृहाची संख्या पाच पेक्षा जास्त असून मुलांची संख्या शेकडो आहे. अशeवेळी बालसुधारगृहातील मुलांची कोरोना टेस्ट होणे गरजेचे असल्याचे मत महापौर लिलाबाई अशान यांनी मांडले.
बालसुधारगृह इमारतीचे संपूर्ण सॅनिटाईज
शासकीय बालसुधारगृहात मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर, महापालिका आरोग्य विभागाने बालसुधारगृहाच्या संपूर्ण इमारत सॅनिटाईज केली. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. तसेच कोरोना संसर्गित व निगेटिव्ह टेस्ट आलेल्या संपूर्ण मुलावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याचे रिजवानी म्हणाले.