CoronaVirus ठाण्यात कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलेची प्रसूती; बालिकेचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:03 PM2020-05-07T20:03:03+5:302020-05-07T20:17:07+5:30
कोविड रुग्णालयातील पहिली यशस्वी सीझर प्रसूती ; मायलेकींची प्रकृती स्थिर
- पंकज रोडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: येथील जिल्हा कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेची गुरुवारी यशस्वी सीझर शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. त्या महिलेची पहिली प्रसूती सीझर झाली असल्याने दुसरी प्रसूतीही सीझर करावी लागली. कोविड रुग्णालयात जन्माला आलेल्या त्या नवजात बालिकेचे रुग्णालयातील डॉ वंदना पाटील यांच्या हस्ते बेबी किट देत स्वागत केले. या प्रसूतीनंतर त्या बालिकेचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच जिल्ह्यातील ही पहिलीच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महिलेची प्रसूती असल्याची माहिती ठाणे रुग्णालय प्रशासनाने दिली.
संबंधित महिला ही कल्याण येथील रहिवासी असून तिचे वय 25 वर्ष आहे. त्या बाळंतिणीला 4 मे रोजी उपचारार्थ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास त्या महिलेची प्रसूती झाली त्या महिलेने एका गोंडस 2.8 किलो वजनाच्या बालिकेला जन्म दिला. ही सीझर प्रसूती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार,डॉ.नेताजी मुळीक,डॉ सृजित शिंदे,डॉ.प्रसन्ना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ.अर्चना आखाडे यांनी केली तर भूलतज्ञ म्हणून डॉ प्रियंका महागडे या उपस्थित होत्या.
डॉ.साधना तायडे यांची रुग्णालयाला भेट
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ.साधना तायडे यांनी गुरुवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी,त्यांनी रुग्णालयातील नियंत्रण कक्षेतून सेंट्रल साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डमधील उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.तसेच त्यांनी डॉक्टर,नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.त्याचबरोबर त्यांनी रुग्णालयामार्फत सुरू असलेल्या कामाचे कौतुकही केले आहे.याप्रसंगी, त्यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलाश पवार उपस्थित होते.
प्रसूती तसेच डायलेसिस याचे रुग्ण येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्या प्रमाणे रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही प्रसूती यशस्वी झाली असून बाळ आणि बाळंतिणीची प्रकृती स्थिर आहे. ही जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेची पहिलीच प्रसूती आहे.
-डॉ.कैलाश पवार , जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.