CoronaVirus News: डायलिसिस करून गेलेल्या 'त्या' रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; प्रसुती रुग्णालयात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 11:12 AM2020-05-09T11:12:47+5:302020-05-09T11:13:04+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा अहवाल यायच्या आधीच डायलिसिस; पालिका प्रसुती रुग्णालयातील डायलिसिस केंद्र बंद
मीरारोड - डायलिसिस रुग्णास भाईंदर पालिकेच्या जोशी कोरोना रुग्णालयात दाखल केलेले असताना त्याच्या चाचणी अहवालाची वाट न पाहताच मीरारोडच्या पालिका प्रसुती रुग्णालयात त्याच्यावर डायलिसिस केले गेले. त्या रुग्णास कोरोना झाल्याचा अहवाल आल्याने दुसऱ्या दिवशी डायलिसिस केंद्र बंद केले गेले. याशिवाय कर्मचारीदेखील धास्तावले आहेत.
मीरारोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात प्रसुतिगृह तसेच बाह्यउपचार विभाग आहे. येथे डायलिसिसची सुविधा आहे. सदर ठिकाणी गरजू रुग्ण डायलिसिससाठी येत असतात. पालिकेच्या भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातदेखील डायलिसिसची सुविधा असली तरी तंत्रज्ञ नसल्याने सेवा धूळखात पडलेली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातच पालिकेने जोशी रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून जाहीर करून तेथे फक्त कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत.
बुधवारी जोशी रुग्णालयात दाखल कोरोना संशयित रुग्णास डायलिसिससाठी मीरारोडच्या गांधी रुग्णालयात नेण्यात आले. सदर रुग्णाला रुग्णालयात नेण्याआधी त्याच्या कोरोना चाचणी अहवालाचीही प्रतीक्षा केली गेली नाही. संशयित रुग्ण असूनही त्याला गांधी रुग्णालयात नेताना आवश्यक खबरदारी घेतली गेली नाही. गांधी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सदर रुग्णास तळ मजल्यावरून उचलून पहिल्या मजल्यावर नेले व तेथे डायलिसिस केले गेले असे सूत्रांनी सांगितले .
नंतर मात्र सदर रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्याने गांधी रुग्णालयातील कमर्चाऱ्यांमध्ये भीती पसरली. कर्मचारी आवारात गोळा झाले. गुरुवारी डायलिसीस केंद्र बंद करून त्याचे सॅनिटायझेशन करावे लागले. गांधी रुग्णालयातील कर्मचारी व प्रसूती गृहात दाखल महिला कोरोना संक्रमित होणार नाही ना?, अशी भीती व्यक्त करत महापालिकेच्या जोशी व गांधी रुग्णालयातील वैद्यकीय प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांच्या या बेजबाबदार भोंगळ कारभारावर माजी नगरसेवक मिलन म्हात्रेंनी संताप व्यक्त केला आहे .
रुग्ण कोरोनाचा संशयित होता तर त्याचा अहवाल यायच्या आधी जोशी रुग्णालयातून गांधी रुग्णालयात पाठवलेच कशाला?, जोशी रुग्णालयात डायलिसिसची सुविधा असताना तेथे तंत्रज्ञ बोलावून घेऊन डायलिसिस सुविधा देता आली असती. या प्रकरणी बेजबाबदार लोकांवर कारवाईची मागणी म्हात्रे यांनी केली आहे. या प्रकरणी पालिकेचे उपायुक्त वाघमारे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांच्याशी माहितीसाठी संपर्क साधला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.