Coronavirus:...तर संतप्त जनता रस्त्यावर उतरल्यास लॉकडाऊनला काहीच अर्थ राहणार नाही; मनसेचं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 08:31 AM2020-04-20T08:31:36+5:302020-04-20T08:32:33+5:30
दिवा विभागात २४ तास वीज खंडित होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.
ठाणे – राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या कालावधीत लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवा येथे वीज पुरवठा खंडित असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रात आमदार राजू पाटील यांनी लिहिलंय की, राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. दिवा विभागातही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्व लोक घरी थांबले आहेत. अशा स्थितीत अत्यावश्यक सेवा असलेला वीज पुरवठा सुरळीत असावा अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु टोरंट कंपनीचा भोंगळ कारभार सुरु असून वीज पुरवठ्यामध्ये बिघाड होऊन १२-१२ तास झाले तरीही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड सापडत नाही हे दुर्दैवी आहे असं त्यांनी सांगितले आहे.
दिवा विभागात २४ तास वीज खंडित होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. वास्तविक या कंपनीला दिवावासियांनी विरोध केला होता. तरीही शासनाने जबरदस्तीने ही कंपनी लादली आहे त्याचे परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. टोरंटपेक्षा महावितरणचा कारभार चांगला होता अशी भावना जनतेमध्ये आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार वीज खंडित होत असल्याने त्रस्त जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्यास लॉकडाऊनचा काहीही उपयोग होणार नाही अशी भीती मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपासून दिवा विभागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. 12-12 तास होऊनही टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड सापडत नाही. येथे एक #corona+ रुग्ण सापडला आहे त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. रहिवासी रस्त्यावर उतरल्यास शटडाऊनला कोणताही अर्थ उरणार नाही. @NitinRaut_INCpic.twitter.com/GduVRVINWX
— Raju Patil (@rajupatilmanase) April 19, 2020
त्यामुळे या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दिवा-शीळ विभागातील टोरंट कंपनीच्या हातातील कारभार तात्काळ काढून महावितरणकडे घेण्यात यावा. सतत होणाऱ्या वीजेच्या खेळ-खंडोबामुळे रहिवासी रस्त्यावर उतरल्यास लॉकडाऊनला कोणताही अर्थ उरणार नाही व याची सर्वस्वी जबाबदारी ऊर्जा विभाग आणि टोरंट कंपनीच्या प्रशासनावरच राहील याची दखल घ्यावी असा इशाराही मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रातून दिला आहे.