coronavirus: चाचण्यांच्या तुलनेत पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगरमध्ये अधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:10 AM2020-09-04T02:10:06+5:302020-09-04T02:10:14+5:30
सर्वाधिक चाचण्या असून ठाण्यात कमी रुग्ण, आकडेवारीवरून स्पष्ट
ठाणे : गणेशोत्सवानंतर सर्वच महापालिका क्षेत्रांत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक चाचण्या करण्यात येत असतानाही झालेल्या चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण मात्र सर्वातकमी आहे. २ सप्टेंबर रोजी सर्व महापालिकांमध्ये झालेल्या चाचण्या आणि सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आधारे हे प्रमाण स्पष्ट झाले आहे.
ठाण्यात आजघडीला दररोज चार हजारांपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करण्यात येत असून पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांची टक्केवारी मात्र ६.२ टक्क्यांवरच आहे. त्यामानाने मोठ्या महापालिकांचा विचार केल्यास सर्वाधिक पनवेल महापालिकेत हा आकडा २७ टक्के असून त्यानंतर उल्हासनगर आणि नवी मुंबई महापालिकेचा क्रमांक लागतो. पनवेल महापालिका क्षेत्रात या दिवशी केवळ ८४१ टेस्ट केल्या असून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण मात्र २७ टक्क्यांवर आहे. त्याखालोखाल उल्हासनगर महापालिका क्षेत्रात ३७६ चाचण्या करण्यात आल्या असून १५.४२ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण आहे.