घरात थांबलो तर खायचं काय?; उपासमारीची वेळ आलेल्या नाका कामगारांचं मुख्यमंत्र्यांना साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 05:32 PM2020-03-25T17:32:16+5:302020-03-25T17:47:21+5:30
उल्हासनगरातील ५० हजार नाका कामगारांची अवस्था बिकट
उल्हासनगर : नाका कामगार व मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना शिधा वाटप दुकानातून मोफत धान्य वाटप करा, अशी मागणी कामगार नेते राधाकृष्ण साठे व शहर मनसेने थेट मुखमंत्री उद्धव ठाकरेंकडे निवेदनाद्वारे केली.
उल्हासनगरात लहान व मोठे अनेक उधोग असून त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त आहे. कर्फ्यूमुळे त्यांच्या कामावर गदा येऊन त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली. हाताला काम नसल्याने दोन वेळ खायचे काय? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला असून त्यांच्यासह कुटुंबाची उपासमार सुरू झाली. अशांना मदतीचा हात देण्याची तयारी विविध सामाजिक संस्थेने महापालिका आयुक्त देशमुख यांना बोलून दाखवली. मात्र कोनोरा संसर्गाच्या भीतीने आयुक्ताने निर्णय घेण्यास वेळ मागितला आहे. दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी अशा गरीब व गरजू कुटुंबाना शिधा वाटप दुकानातून मोफत अन्नधान्य देण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
नाका कामगारासह मोलमजुरी करणाऱ्या कामगारांची उपासमार होत असून त्यांना शासनासह सामाजिक संस्थेने वेळीच मदतीचा हात पुढे केला नाहीतर, महामारी पसरण्याची भीती कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी व्यक्त केली. शासन मदत करीत नसेलतर सामाजिक संस्थेना मदतीचा हात देण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने द्यावी. अशी मागणी साठे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. येत्या दोन दिवसात त्यांचा खाण्याचा प्रश्न निकाली निघाला नाहीतर, शहरात वेगळीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.