coronavirus: कोरोनानंतर जीवनशैली बदलण्याची गरज, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 03:58 AM2020-05-10T03:58:25+5:302020-05-10T07:46:22+5:30
कोरोना डिप्रेसिंंग नाही, पण त्यासाठी पाळावयाचे नियम कठीण आहे. त्यामुळे घरात कुटुंबासोबत आनंदाने राहा, जुने छंद जोपासा, असे आवाहनही त्यांनी केले.
ठाणे : कोरोनानंतर शहरातील माणसांनी अजीवनशैली बदलण्याची गरज आहे. कोरोना कधी संपेल माहीत नाही. मास्क हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल डिस्टन्सिंंग हा शब्द चुकीचा आहे. आपण फिजिकल डिस्टन्सिंंग पाळले पाहिजे. दुर्दैवाने आपण ते अजिबात पाळत नाही, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक, मॅगेसेसे पुरस्कार विजेते, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.
कोरोना डिप्रेसिंंग नाही, पण त्यासाठी पाळावयाचे नियम कठीण आहे. त्यामुळे घरात कुटुंबासोबत आनंदाने राहा, जुने छंद जोपासा, असे आवाहनही त्यांनी केले. आनंद विश्व गुरुकुल वरिष्ठ रात्र महाविद्यालय आयोजित संवाद मनाचा या कार्यक्रमात डॉ. आमटे यांची झूमअॅपद्वारे निवेदक मकरंद जोशी यांनी मुलाखत घेतली.
डॉ. आमटे म्हणाले, आता आपण आपल्या गरजा कमी कराव्या. आज ज्याच्याकडे भरपूर पैसे आहे तो ही लॉकडाउनमध्येच आहे. आज सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. संकटकाळी ज्यांची आठवण होते ते कुलुपात आहेत. आज जास्त गरज आहे ती डॉक्टर, पोलिसांची. हे सगळे लढत आहेत. यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहू या. लॉकडाउनचे सर्व नियम आपण पाळावे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका हा ६५ वर्षांवरील व्यक्तीला अधिक असतो. तुलनेने लहान मुलांना तो कमी असतो. कोरोनावर लस शोधण्यात संपूर्ण जग मागे लागले आहे. तोपर्यंत आपण संयम ठेवला पाहिजे. प्राणी पिंजऱ्यात कसे राहतात याचा अनुभव आपण घेत आहोत.
व्यसनमुक्त होण्याची संधी
कोरोनामुळे आज सारे जग झू झाले असून प्राणी रस्त्यावर मोकळेपणाने फिरत आहेत. आज आपल्याला अन्नधान्याची सोय आहे. परंतु, आपण आपल्या जिभेचे चोचले कमी करावे. अलीकडे दारूची दुकाने उघडली तेव्हा ज्या प्रमाणात गर्दी झाली, ते पाहता यातूनही कोरोनाचा धोका वाढू शकतो. आपण ५० दिवस संयम ठेवला तर आणखीन पुढेही ठेवू शकतो. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला कोरोनाचा धोका अधिक असल्याचे आपण ऐकले आहे. त्यामुळे या काळात आपल्याला व्यसनमुक्त होता येईल का, हाही एक चांगला संदेश आहे. त्यामुळे आपण पुढील आयुष्य चांगले जगू शकू, असा सल्लाही त्यांनी दिला. सुरुवातीला हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या आठवणी त्यांनी उलगडल्या.