CoronaVirus News: 102 वर्षाच्या आजोबांची कोरोनावर यशस्वी मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 08:56 PM2020-06-29T20:56:50+5:302020-06-29T21:22:22+5:30
ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना, दुसरीकडे या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे.
ठाणे : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजाराबाबत नागरिकांच्या मनात विविध शंका आणि भीती निर्माण झाली आहे. त्यात याची लागण झाल्यानंतर आपण बरे होवू ना अशा अनेक प्रश्नांनी लोकांच्या मनात काहूर माजवत आहे. असे असतांना, दुसरीकडे ठाण्यातील खाजगी रुग्णालयात एका 102 वर्षाच्या आजोबांची इच्छाशक्तीच्या जोरावर व डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या योग्य उपचारामुळे कोरोनावर यशस्वी मात करीत घरी परतले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना, दुसरीकडे या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातून नुकतेच 100 वर्षाची आजीबाईसह 91 आणि 85 वर्षाच्या महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात सोमवारी ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव खोपट परिसरात राहणाऱ्या 102 वर्षाच्या इसमाने जवळपास एक महिन्याच्या उपचारानंतर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.
ठाण्यातील खोपट सिद्धेश्वर तलाव परिसरात 102 वर्षीच्या वयोवृद्ध इसमाला त्रास होवू लागल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा कोविड अहवाल आल्यानंतर त्यांना 2 जून रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यावर उपचार करीत असतांना, त्यांना निमोनिया असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांना अतिदक्षत विभागात ठेवण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयाच्या पथकाने अथक परिश्रम घेतल आणि अखेर 102 वर्षाच्या आजोबांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना विरुद्धची लढाई जिंकली. सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.