CoronaVirus News: ग्लोबल हॉस्पिटलमधील २०० नर्सेस आणि ५० डॉक्टरांचं काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 11:50 AM2021-06-19T11:50:39+5:302021-06-19T11:51:41+5:30
मध्यरात्री अचानक कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा; हॉस्पिटलच्या बाहेर स्टाफचा गोंधळ
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोव्हीड हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 50 डॉक्टर आणि 200 नर्सेसला अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री कामावरन काढून टाकल्याच्या आणि पवार कमी केल्याच्या नोटिसा त्यांना रुग्णालयाच्या ग्रुप वर टाकण्यात आल्या आहेत. संतापलेल्या डॉक्टर अणि नर्सेसने रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे उर्वरित स्टाफवर आता रुग्णांची सेवा सुरू असून हे प्रकरण अधिक चिघळल्यास कोव्हीड हॉस्पिटलचे व्यवस्थापन करणे संबंधित संस्थेला अणि पर्यायाने ठाणे महापालिकेला कठीण जाणार आहे.
ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने डॉक्टर आणि नर्सेसची भरती करण्यात आली असून ही भरती ओम साई प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून भरण्यात आली आहे. ठाण्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून रुग्णालयातही रूग्णांची संख्या कमी झाली आहे.मात्र अद्याप हे सर्व डॉक्टर्स आणि नर्स आपली सेवा बजावत आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री मात्र संबंधित संस्थेने अचानक पगार कमी करण्याच्या नोटिसा दिल्या असून 50 डॉक्टर आणि 200 नर्सला काढून टाकण्यात येत असल्याच्या नोटिसा दिल्या असून हे सर्व डॉक्टर आणि नर्स रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनाला बसले असून या सर्वांनी आता काम बंद केले आहे.