CoronaVirus News: दिवसभरात ठाणे जिल्ह्यात २१ व्यक्तींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:49 AM2020-06-14T00:49:57+5:302020-06-14T00:50:11+5:30
७७२ जणांना कोरोनाची लागण; नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक रुग्ण
ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोना बाधितांच्या संख्येत ७७२ ने वाढ झाली. २१ जणांचा मृत्यू झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार १७५ तर, मृतांची संख्या ४९३ झाली आहे. शनिवारी नवी मुंबई महापालिकेत सर्वाधिक १९१ रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
नवी मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ३ हजार ७३४ तर, मृतांची संख्या ११४ झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीत शनिवारी १७६ बाधितांची नोंद झाल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ५ हजार ००५ वर पोहोचली आहे. दिवसभरात पाचजणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या १५३ झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये नव्या १६० रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची एकूण संख्या २ हजार ०७१ तर, मृतांची संख्या ५७ झाली आहे. भिवंडी महापालिका हद्दीत नव्या ३८ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांची संख्या ४७० झाली आहे. उल्हासनगर १४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७४२ झाली. अंबरनाथमध्ये ४८ नव्या रुग्णांसह बाधितांची संख्या ६१७ च्या घरात पोहोचली. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नोंद झाली.
डबलसीट दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा
ठाणे : सोशल डिस्टन्सचे नियम पायदळी तुडवत डबल आणि ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी आणि शनिवारी कल्याण-अंबरनाथ महामार्गावर आणि उल्हासनगर शहरात कारवाईचा बडगा उगारला. कोरोनाच्या या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहे. मात्र, लॉकडाऊ नचे नियम शिथिल होताच दुचाकीस्वार डबल, ट्रिपल सीट घेऊ न फेरफटका मारत आहेत. या बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी दंडवसुली करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयात जात असल्याचा बाहाणा करणाऱ्यांना डॉक्टरांची फाइल किंवा काहीतरी पुरावा मागितला जात असल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडत आहे.दुचाकीवरून दोघे, तिघे प्रवास करत असल्यामुळे त्यांच्यापासून संसर्ग फैलावण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दुचाकीस्वारांवर लक्ष केंद्रित केले आहे.
भिवंडीत ३५० बेडच्या रुग्णालयाला मान्यता
भिवंडी : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयावर ताण येत आहे. त्यातच उपचाराअभावी अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
या सर्व बाबींची दखल घेत महापौर प्रतिभा पाटील यांनी भिवंडीत कोरोना रुग्णालयासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली होती.
रुग्णसंख्या वाढत असल्याने ३५० बेडच्या रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. शहरातील पोगाव येथे ४० हजार चौरस फुटाच्या गोदामामध्ये रुग्णालय तयार केले जाणार आहे.
लक्षणे नसलेल्यांनाही विलगीकरण कक्षात
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डेंटल कॉलेजमधील रुग्णालयाची शुक्रवारी पाहणी केली. तर दुसरीकडे बाधित कोरोनाग्रस्ताच्या नातेवाईकांना घरात विलगीकरण न करता पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळत नाहीत अशा रुग्णांना घरातच विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.