CoronaVirus News : ठाण्यात १७ दिवसांत कोरोनाचे ५७६४ रुग्ण; माजिवडा-मानपाडा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 03:44 AM2020-09-19T03:44:59+5:302020-09-19T03:45:29+5:30
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही महापालिकेला यात फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही ठाणेकरांकडून होत नसल्याचे दिसत आहे.
ठाणे : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना ठाण्यात मागील १७ दिवसांत पाच हजार ७६४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात हॉटस्पॉट ठरलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत या कालावधीत सर्वाधिक १३४९ रुग्ण आढळले आहेत. शहरात या काळात ७९ जणांचा मृत्यू झाला असून रिकव्हरी रेट पाच टक्क्यांनी घसरला आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही महापालिकेला यात फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही ठाणेकरांकडून होत नसल्याचे दिसत आहे. आजही शहराच्या अनेक भागांत मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. तोंडाला मास्क लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे आवाहन पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. परंतु, तरीही त्याकडे कानाडोळा होताना दिसत आहे. ठाणे परिवहन सेवेच्या बसमध्ये गर्दी दिसत आहे.
परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे; किंबहुना जे परराज्यातून येत आहेत, त्यामुळेच आता कोरोनाच्या नव्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. एकूणच यामुळे आता सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आॅगस्ट अखेरपर्यंत महापालिका हद्दीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १७४५ एवढी होती. त्यात आता १७ दिवसांत १९३४ रुग्णांची भर पडली असून आजघडीला प्रत्यक्ष उपचार घेणाºयांची संख्या ३६७९ एवढी झाली आहे. तर आॅगस्ट अखेरपर्यंत शहरात ८३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तो आकडा ९१८ वर गेला असून या कालावधीत ७९ जणांचे मृत्यू
झाले आहेत.
रिकव्हरी रेट घसरला ८५ टक्क्यांवर
गेल्या १७ दिवसांत महापालिका हद्दीत पाच हजार ७६४ नव्या रुग्णांची भर पडली असून याच कालावधीत तीन हजार ७५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट हा ९० टक्क्यांवरून आता ८५ टक्क्यांवर आला आहे. त्यातही माजिवडा मानपाडा या प्रभाग समितीत रोजच्या रोज ५० ते १०० रुग्ण आढळत आहेत. दिवसेंदिवस ही चितेंची बाब ठरत आहे. त्याखालोखाल नौपाडा प्रभाग समितीतही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.