CoronaVirus News: लक्ष्मी मार्केटमधील ७०० व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:02 AM2020-06-17T00:02:50+5:302020-06-17T00:03:07+5:30
दुकाने उघडण्यास परवानगी नाही : तीन महिन्यांपासून परवड, आयुक्तांनी स्वत: केली होती पाहणी
कल्याण : पश्चिमेतील लक्ष्मी मार्केटमधील व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने उघडण्याची परवानगी अद्याप केडीएमसीने दिलेली नाही. त्यामुळे ७०० भाजी व फळविक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अन्य दुकाने उघडण्याची परवानगी दिली जात असताना आमच्यावर अन्याय का, असा संतप्त सवाल तेथील व्यापाºयांनी मंगळवारी केला.
देशात २४ मार्चला जाहीर झालेल्या लॉकडाऊनपासून लक्ष्मी मार्केट बंद आहे. त्यामुळे व्यापाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनलॉक १ मध्ये बाजार समिती तसेच शहरात किरकोळ भाजीपाला विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. समविषम पद्धतीने शहरातील अन्य दुकाने तसेच झुंझारराव मार्केटमधील अन्नधान्यांची दुकानेही सुरू झाली आहेत. मात्र, लक्ष्मी मार्केटवरील बंदी कायम आहे. आठवडाभरापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक रवी पाटील, भाजी मार्केटचे पदाधिकारी रफीक तांबोळी व मोहन नाईक यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत त्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत निवदेन दिले. त्यानंतर आयुक्तांनी स्वत: मार्केटची पाहणी केली.
सोशल डिस्टन्सिंगचे अन्यत्र किती पालन होते?
लक्ष्मी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार नाही, या भीतीपोटी परवानगी देणे टाळले जात असेल तर या नियमाचे अन्य ठिकाणी किती पालन होते, असा संतप्त सवाल व्यापाºयांनी केला आहे.