CoronaVirus News: ‘अॅण्टीजेन’ला नकार देणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:55 AM2020-08-11T00:55:45+5:302020-08-11T00:55:56+5:30
केडीएमसी आयुक्तांचे आदेश; आरोग्य खात्याची माहिती
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्ण हुडकून काढण्याकरिता व पर्यायाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याकरिता सुरू केलेल्या अॅण्टीजेन टेस्ट करण्यास नकार देणाºया खासगी डॉक्टरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
जे खासगी डॉक्टर अॅण्टीजेन टेस्टला नकार देतील, त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या जुलै महिन्यात वाढली होती. कोरोना रुग्णांच्या टेस्टिंगसाठी केवळ सहा स्वॅब टेस्टिंग सेंटर होते. तसेच कोरोना टेस्टिंग लॅब गौरीपाड्यात सुरू झालेली नव्हती. कोरोना रुग्णाला कोरोना झाला आहे, हे तातडीने समजावे, यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात १० हजार अॅण्टीजेन टेस्ट किटची खरेदी केली. महापालिकेने कोरोना रुग्ण शोध मोहिमेंतर्गत अॅण्टीजेन टेस्टला सुरुवात केली आहे. या टेस्टचा सकारात्मक परिमाण दिसून येत आहे. टेस्टचा रिपोर्ट लगेच उपलब्ध होत असल्याने रुग्णावर उपचार सुरू करणे शक्य होत आहे. अॅण्टीजेन टेस्ट मोफत केली जाते व त्याचे किट खाजगी डॉक्टरांना पुरविले जाते.
मात्र, काही खाजगी डॉक्टर ताप आलेल्या रुग्णांच्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट करतात. त्यात डेंग्यू, मलेरिया, रक्तचाचणी, छातीचे सीटी स्कॅन करतात.
मात्र, अॅण्टीजेन टेस्ट करीत नाहीत. रुग्णाची कोविड टेस्ट न केल्याने त्याला गंभीर स्वरूपाचा त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. त्याला कोविड रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याची कोविड टेस्ट करणे गरजेचे असते.
मात्र, त्याची कोविड टेस्ट झालेली नसल्याने अशा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असतानाही कोविड रुग्णालयात दाखल करता येत नाही. अनेक खाजगी डॉक्टर रुग्णाला न्यूमोनिया झाला आहे, असे समजून न्यूमोनियाचे उपचार करतात. त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावते. प्रसंगी त्याचा मृत्यू होतो. परिणामी, कोरोनाचा मृत्युदर वाढतो. ही बाब गंभीर असल्याने खाजगी डॉक्टरांविरोधात महापालिकेकडून साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे.
केवळ टेस्ट करणे गरजेचे
महापालिका हद्दीत आतापर्यंत सात हजार ९८९ जणांची कोविड अॅण्टीजेन टेस्ट केली आहे. मनपाकडे आजमितीस २८ हजार अॅण्टीजेन टेस्ट किट उपलब्ध आहेत. तसेच स्वॅब टेस्टचे १३ हजार किट महापालिकेकडे उपलब्ध आहेत. महापालिका हद्दीत स्वॅब घेऊन ४८ हजार जणांची टेस्ट केली आहे.
महापालिका हद्दीत आतापर्यंत कोरोनाचे २२ हजार १५५ रुग्ण आढळून आले. १७ हजार ४० जण बरे झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या चार हजार ६८४ आहे. रुग्णदुपटीचा दर हा ५३ दिवसांचा आहे, तर मृत्युदर १.८ टक्के आहे. अन्य महापालिकांच्या तुलनेत हा मृत्युदर कमी आहे.