CoronaVirus News: व्होल्टास कंपनीच्या जागेवर आणखी एक १००० बेड्सचे रुग्णालय उभारणार- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 07:19 PM2020-06-26T19:19:07+5:302020-06-26T19:19:18+5:30
कोरोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे.
ठाणे: ठाण्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये लॉकडाउनची कठोर अमंलबजावणी करून मास स्क्रीनिंग आणि काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर देतानाच तपासण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले.
बाळकुम येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील रुग्णालयाच्या धर्तीवर पोखरण रोड क्र. २ येथील व्होल्टास कंपनीतील मोकळ्या जागेवरही एक हजार बेड्सचे आणखी एक रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.ठाणे महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री शिंदे यांनी पालिका प्रशासनासमवेत करोनासंदर्भात आढावा बैठक घेतली.
महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली क्वारंटाइन सेंटर्स, तसेच कोव्हिड रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉइज व अन्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये, यासाठी त्यांना वाढीव मानधन देण्याची सूचना शिंदे यांनी केली. कोरोनाविरोधातील लढाईत हे सर्व कर्मचारी आघाडीवर राहून स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना पुरेसा आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे, असे शिंदे म्हणाले. कोरोनाविरोधातील लढाईत आपण महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. गेल्या तीन-सव्वा तीन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे आपण हजारो लोकांना करोनाची बाधा होण्यापासून वाचवले. तसेच अनेकांचे प्राणही वाचवण्यात आपल्याला यश आले.
कोरोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्कपणे या लढाईला सामोरे जावे लागेल, असे सांगून यात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला.सिडकोच्या माध्यमातून ठाण्यात एक हजार बेड्सचं रुग्णालयपोखरण क्र. २ येथील व्होल्टास कंपनीच्या जागेवर सिडकोच्या माध्यमातून एक हजार बेड्सचे कोव्हिड रुग्णालय उभारण्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली.
आयुक्त डॉ. शर्मा यांच्यासह त्यांनी कंपनीच्या जागेची पाहणीही केली. ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या धर्तीवरच या नव्या रुग्णालयातही ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्स, आयसीयू, डायलिसिस केंद्र, रेडिओलॉजी विभाग, पॅथॉलॉजी आदी सर्व सुविधा उपलब्ध असतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.