CoronaVirus News: शनिवारपर्यंत मिळणार ‘आरोग्यकुंडली’; संपूर्ण जिल्ह्याचा लेखाजोखा कळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:30 AM2020-10-09T00:30:02+5:302020-10-09T00:30:11+5:30
जिल्हा प्रशासनासह सर्व महापालिका आयुक्तांचेही सर्व्हेकडे जातीने लक्ष
- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील २0 लाख ५८ हजार ७७५ लोकसंख्येचा आरोग्य सर्व्हे शनिवारपर्यंत पूर्ण करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना जोर आला आहे. या सर्वेक्षणातून नागरिकांची आरोग्यकुंडली घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी सुरु आहे.
कोरोनाच्या या महामारीत प्रत्येक घराच्या आरोग्याचा सर्व्हे केला जात आहे. १० आॅक्टोबरपर्यंत तब्बल पाच लाख ९३ हजार ५९९ कुटुंबांमधील २० लाख ५८ हजार ७७५ लोकांच्या आरोग्याचा लेखाजोखा प्रशासनाच्या हाती पडणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असून, जिल्ह्यात ७३८ पथक याकामी तैनात आहेत. ग्रामीण भागात ६३२ पथकांकडून १५ लाख २६ हजार ६६१ लोकांच्या सर्वेक्षणाकरिता चार लाख नऊ हजार ६९७ कुटुंबांचे दरवाजे ठोठावले जात आहेत.
जिल्हा प्रशासनाप्रमाणेच महापालिकांचे आयुक्तही या सर्वेक्षणाकडे जातीने लक्ष केंद्रित करून आहेत. या सर्वेक्षणात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दोन स्वयंसेवक देणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी ते कमी पडले आहेत. अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, आरोग्यसेवक आदींच्या या पथकांना स्मार्टफोनद्वारे कामाचे रेकॉर्ड त्वरित करण्यासह छापील फॉर्मही भरावे लागत आहेत. या पथकांना टी-शर्ट्स, कॅप्स, बॅच, हॅण्डग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझर देण्यात आले असून, ते स्टिकर्स व मार्कर पेनच्या साहाय्याने घराच्या दरवाजांवर आरोग्य सर्वेक्षण तपासणी केल्याचे नमूद करत आहेत.