Coronavirus News: मोठी बातमी: ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाही कोरोनाची लागण
By जितेंद्र कालेकर | Published: September 7, 2020 03:26 PM2020-09-07T15:26:25+5:302020-09-07T15:35:51+5:30
ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही रविवारी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेले अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राज्यातील ते पहिलेच अधिकारी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही रविवारी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेले अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राज्यातील ते पहिलेच अधिकारी आहेत. ठाण्यात आतापर्यंत १२९ अधिकाऱ्यांसह एक हजार ३०५ पोलीस बाधित झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून फणसळकर यांना खोकला आणि ताप येत होता. त्यामुळे त्यांनी रविवारी कोरोनाची तपासणी केली. या तपासणीमध्ये ते पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ते मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचे आॅक्सिजनचे प्रमाण चांगले असून प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस आणि नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी फणसळकर हे कार्यालयात तसेच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या सर्वच परिमंडळातील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते. परप्रांतीयांची घरवापसीसाठीही त्यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष दिले होते. मुंब्रा तसेच भिवंडीसारखा संवेदनशील परिसरही त्यांनी पिंजून काढला होता. पोलिसांमध्ये वाढते कोरोनाचे प्रमाण लक्षात घेता त्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये काही सामाजिक संस्थांच्या मदतीने कोरोना तपासणी आणि उपचाराची मोहीम राबविली होती.
ठाणे पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत १०९ अधिकाऱ्यांसह १०५५ कर्मचारी अशा एक हजार १६४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ताप आणि खोकला आहे. आपण लवकरच कोरोनावर मात करु, असा विश्वास फणसळकर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला.
* यापूर्वी, पोलीस आयुक्तांचे रिडर अजय घोसाळकर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनाही लागण झाल्यामुळे आयुक्तालयात चिंतेचे वातावरण आहे.