Coronavirus News: कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार: मुंबईच्या वितरकाचा अटकपूर्व जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 07:19 PM2020-09-07T19:19:45+5:302020-09-07T19:23:13+5:30
कोरोनाच्या भीषण परिस्थितीचा गैरफायदा घेत कोरोनावरील रेमडिसिवीर आणि टोकलीझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करणारा मुंबईतील वितरक प्रविण जैन याचा अटकपूर्व जामीन ठाण्याचे सत्र न्यायाधीश ए. एस. पंढरीकर यांनी नुकताच फेटाळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात अनेकांचे मृत्यु ओढवले आहेत. नेमकी याच परिस्थितीचा गैरफायदा घेत कोरोनावरील रेमडिसिवीर आणि टोकलीझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करणारा मुंबईतील वितरक प्रविण जैन याचा अटकपूर्व जामीन ठाण्याचे सत्र न्यायाधीश ए. एस. पंढरीकर यांनी नुकताच फेटाळला आहे. सध्याच्या परिस्थितीचा तो गैरफायदाही घेऊ शकतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.
रेमडिसिवीर आणि टोकलीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने यापूर्वीच पाच जणांना अटक केली आहे. कोणत्याही बिलाशिवाय जैन याच्याकडूनच ही इंजेक्शन घेतल्याची बाब ठाणे खंडणी विरोधी पथकाने या पाच जणांकडे केलेल्या चौकशीत उघड झाली आहे. जैन याने ही औषधे किती जणांना विक्री केली? ती खरी आहेत की बनावट? याचाही शोध घेतला जावा. तसेच जैन यालाही अटक केली जावी, असेही आदेश ठाणे न्यायालयाने शनिवारी दिले.
कोरोनावर बऱ्यापैकी गुणकारी ठरत असल्यामुळे रेमडिसिवीर आणि टोकलिझुमॅब या इंजेक्शनच्या मागणीतही मोठया प्रमाणात वाढ झाली. त्याचवेळी दुसरीकडे या औषधांच्या काळयाबाजारालाही मोठया प्रमाणात सुरुवात झाली. चढया दराने या औषधांची विक्री होत असल्यामुळे मुंबईसह ठाणे पोलिसांनीही अशा काळाबाजार करणाऱ्यांचे अटकसत्र सुरु केले. ठाणे खंडणी विरोधी पथकाने जुलैमध्ये अरु ण सिंग, सुधाकर गिरी, रवींद्र शिंदे, वसीम अहमद अब्दुल अहमद शेख आणि अमतिाभ दास या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. या आरोपींकडून रेमडिसिविर आणि टोकलिझुमॅबसह इतरही औषधे जप्त करण्यात आली होती. याच आरोपींच्या चौकशीत मुंबईच्या वडाळा येथील वितरक जैन याचे नाव समोर आले. आरोपींनी जैन याच्याकडून ही औषधे बेकायदा विनाबिल घेतले. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना ही औषधे मुळ किंमतीपेक्षा जादा दरानरे विक्री केली.जैन याच्या वडाळा येथील कार्यालयावर धाड टाकूनही तो ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या हाती लागला नाही. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांनी त्याचे कार्यालय देखिल सील करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, भूमीगत राहून त्याने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला. याच अर्जाच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील संजय मोरे यांनी त्याला जामीन मिळू नये यासाठी न्यायालयात जोरदार बाजू मांडली. अॅड. मोरे आणि तपासी अधिकाºयांचे मुद्दे गृहित धरुन त्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. आरोपीला जामीन मिळावा, अशी मागणी त्याच्या वकीलांनी केली. मात्र, जामीन मिळाल्यानंतर तो सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळेच त्याला जामीन देता येणार नाही, असे मत न्यायालयाने यावेळी नोंदविले.