CoronaVirus News: ठाण्यात मध्यवर्ती रुग्णभरती योजना; कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार वेळेत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:47 AM2020-06-16T00:47:13+5:302020-06-16T01:44:57+5:30
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ज्यांना लक्षणे नाहीत, तेदेखील आतापर्यंत रुग्णालयात दाखल होत होते. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसत आहेत, अशा गोरगरीब रुग्णांना उपचार मिळत नव्हते.
- अजित मांडके
ठाणे : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ज्यांना लक्षणे नाहीत, तेदेखील आतापर्यंत रुग्णालयात दाखल होत होते. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसत आहेत, अशा गोरगरीब रुग्णांना उपचार मिळत नव्हते. त्यांना खाटाही उपलब्ध होत नव्हत्या. परंतु आता पालिकेने यासंदर्भात मध्यवर्ती रुग्णभरती कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळणार असून त्याची हेळसांड थांबण्यास मदत होणार आहे. त्याने कोणत्या रुग्णालयात दाखल व्हावे, याची माहिती त्याला या मध्यवर्ती रुग्णभरती कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ठाण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, प्रत्येकाला वेळेत उपचार मिळतातच, असे नाही. त्यातही ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतील, त्यांच्यासाठी महापालिकेने काही हॉटेल आरक्षित केली आहेत. परंतु, त्याठिकाणी श्रीमंत मंडळी जात नाहीत. ते रुग्णालयात बेड अडवून ठेवत आहेत, तसेच रुग्णालयेदेखील अशांकडून लाखोंची बिले उकळत आहेत. याला चाप बसावा म्हणून ही योजना पुढे आणण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून आपत्ती निवारण केंद्र तयार करून याठिकाणी २४ तास डॉक्टरांचा स्टाफ नेमला जाणार आहे. यासाठी कळवा रुग्णालयातील डॉक्टर घेतले जाणार आहेत. रुग्णाची माहिती ते घेणार आहेत किंवा एखाद्या खाजगी डॉक्टरने येथील टीमला रुग्णाबाबत माहिती दिली की, त्याला लक्षणे आहेत किंवा नाहीत, तीव्र किंवा सौम्य लक्षणे आहेत, हे जाणून घेऊन त्यानुसार रुग्णावर कुठे उपचार करणे शक्य आहे, तसेच कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, रुग्णाला कुठे जाणे शक्य होईल, यासाठीचा आढावा घेऊन त्यानुसार रुग्णाला जवळच्याच रुग्णालयात भरती केले जाणार आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णाला खाजगी रुग्णालये दाखल करुन घेत असतील, तर अशा रुग्णालयांची पाहणीदेखील आता सुरु करण्यात आली आहे.
लक्षणे नसलेल्या श्रीमंत रुग्णांनीदेखील खाजगी रुग्णालयात न जाता, त्यांनी हॉटेलमध्ये अॅडमिशन घ्यावे, अशा सूचनाही या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. कळवा हॉस्पिटलच्या डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून कोणत्या रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत, याची माहिती घेतली जात आहे.
लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार, याचे कामकाजही सुरु करण्यात आले आहे. या योजनेमुळे गोरगरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळणार आहेत. - विश्वनाथ केळकर, उपायुक्त, ठामपा