CoronaVirus News: कल्याण डोंबिवलीतील कोरोना उपाययोजनांची केंद्रीय पथकाने केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 02:43 PM2020-05-13T14:43:01+5:302020-05-13T14:48:29+5:30
कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सरकारी पातळीवर केल्या जात आहे.
कल्याण: कोरोनाचे रुग्णांची संख्या जास्त असल्याने ठाणो जिल्हा रेडझोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठाणे जिल्ह्यातील कल्याणडोंबिवली महापालिका कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने कोरोना रोखण्यासाठी महापालिकेकडूून केल्या जाणाऱ्या उपाययोजनाची केंद्रीय पथकाने दोन दिवस पाहणी केली. या ठिकाणी कोरोना टेस्टींग लॅब नसल्याचा महत्वाचा निष्कर्ष या पथकाने नमूद केला आहे.
देशातील 20 जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढतोय. या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सरकारी पातळीवर केल्या जात आहे. या उपाययोजनाची पाहणी करुन त्याचा आढावा घेण्यासाठी 20 जिल्ह्यांकरीता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रलयातर्फे पाहणी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी डॉ. दीपक पाल व केतकी शर्मा या दोन डॉक्टरांचे पथक ठाणो जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर आहे. या पथकाने कल्याण डोंबिवली शहरातील कोरोनाची स्थितीची पाहणी काल मंगळवारी व आज बुधवारी केली. हे पथक जिल्ह्यात 15 दिवसाकरीता आहे.
कल्याण डोंबिवलीच्या पाहणी पश्चात उद्या हे पथक नवी मुंबईला रवाना होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महापलिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय, भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्र येथे भेट दिली. त्याठिकाणी रुग्णांना महापलिकेकडून दिले जाणारे जेवण त्यांच्या सोयी सुविधांची माहिती घेतली. त्यापश्चात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवंगारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर कोरोना रोखण्यासाठी आणखीन काय करता येईल याविषयीच्या काही महत्वाच्या सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यात प्रामुख्याने एक बाब पथकाच्या निदर्शनास आली आहे. कोरोना टेस्टींग लॅब ही मुंबईला आहे. त्यामुळे रिपोर्ट करीता मुंबईतील रुग्णालयाववर अवंलबून राहावे लागते. त्यामुळे रिपोर्ट येण्यास उशिर होतो. ही बाब पाहणी पथकाकडून केंद्र सरकारच्या निदर्शनास आणली जाणार आहे. याशिवाय पथकाने पोलिस उपायुक्तांची भेट घेतली. यावेळी शहरातील लॉकडाऊन अधिक कडक पद्धतीने पाळले जावे यावर भर द्यावा अशी सूचना केली आहे.