CoronaVirus News: कोविड रुग्णालयाचा अनागोंदी कारभार उघड; ठामपाने बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:45 AM2020-06-16T00:45:36+5:302020-06-16T00:45:46+5:30

अतिदक्षता विभागातील उपचाराच्या नोंदीच गायब

CoronaVirus News: Chaotic affairs of Kovid Hospital exposed | CoronaVirus News: कोविड रुग्णालयाचा अनागोंदी कारभार उघड; ठामपाने बजावली नोटीस

CoronaVirus News: कोविड रुग्णालयाचा अनागोंदी कारभार उघड; ठामपाने बजावली नोटीस

Next

ठाणे : आणखी एका कोविड रुग्णालयाचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे. मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांवर कोणते उपचार सुरु आहेत, याच्या नोंदीच नसल्याचा धक्कादायक प्रकार पालिका प्रशासनाच्या पाहणीत समोर आला. या रुग्णालयालाही ४८ तासांमध्ये खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. हा खुलासा असमाधानकारक आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या रुग्णालयांनी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णानांही अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले होते. त्यामुळे ज्यांना गंभीर स्वरुपाचा आजार आहे, अशा रुग्णांना जागा मिळणेही अवघड झाले होते. हा प्रकार निदर्शनास येताच सफायरला तीन लाखांचा तर ठाणे हेल्थ केअरला १३ लाखांचा दंड पालिका प्रशासनाने ठोठावला. मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालयाबाबतही तक्रारी आल्यानंतर आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्यासह पालिकेच्या काही डॉक्टरांनी ११ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान पीपीई किट परिधान करुन या रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी अनेक गैरप्रकार या पथकाच्या निदर्शनास आले. अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांच्या उपचाराच्या दैनंदिन वैद्यकीय नोंदीमध्येच हलगर्जीपणा होता. याच विभागातील रुग्णांच्या फुप्फुसाच्या गंभीर बाबींचा आढावा घेण्यासाठी क्ष किरण प्रतिमा काढलेली नव्हती. ज्या काढल्या होत्या, त्यांचा दर्जा सुमार होता. याठिकाणी आयसीयू आणि एनओयू दोन्ही मिळून नऊ खाटा दाखविण्यात आल्या होत्या. परंतु, ठामपाच्या कोविगार्ड पोर्टलवर ४३ जागा असल्याचे दाखवून दिशाभूल करण्यात आली होती. याच रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर ४१२ क्रमांकाच्या कक्षात चार खाटांवर कोविडचे रुग्ण होते. तिथेच जुन्या लाकडी सामानांसह भंगाराची साधनसामग्री होती. रुग्णांच्या कक्षात टाकाऊ सामान असणे, हाही रोगाला खतपाणी देण्याचाच प्रकार होता. रुग्णालयाच्या या कृतीमुळे रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांच्या जीवालाही धोका संभवत असून ही गंभीर बाब असल्याचे निरीक्षण पालिकेच्या पथकाने नोंदविले आहे.

कोविडसह कोणत्याही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रुग्णावर केलेल्या उपचाराच्या नोंदी असणे आवश्यक असते. तेच या रुग्णालयात आढळले नाही. इतरही काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यामुळे काळसेकर रुग्णालयाला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.
- विश्वनाथ केळकर, उपायुक्त, आरोग्य विभाग, ठाणे महापालिका

रुग्णांची दैनंदिन स्थिती आणि त्यानुसार उपचारांमध्ये केलेले बदल याच्या कोणत्याही नोंदी अतिदक्षता विभागात आढळल्या नाही. ही बाब बेकायदेशीर असून त्यामुळे उपचारामध्येही चुका होण्याची शक्यता आहे. नाही. अशा गंभीर बाबीनेही मुळात जीवघेण्या असलेल्या आजाराने ग्रस्त रुग्णाच्या मृत्यूचे कारण होऊ शकते, असेही निरीक्षण पालिकेच्या पथकाने नोंदविले आहे.

Web Title: CoronaVirus News: Chaotic affairs of Kovid Hospital exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.