CoronaVirus News: कळमकर कुटुंबीयांना ५० लाखांचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 01:03 AM2020-10-06T01:03:41+5:302020-10-06T01:03:49+5:30
कोरोनामुळे मृत्यू; मुलीला मिळाली नोकरी
कल्याण : कोरोनामुळे मरण पावलेले पोलीस नाईक संतोष कळमकर यांच्यासह अन्य पोलीस कुटुंबीयांच्या व्यथा ‘लोकमत’ने सोमवारी मांडल्यानंतर कळमकर यांच्या कुटुंबाला राज्य सरकारतर्फे ५० लाख रुपये मदतीचा धनादेश तातडीने सुपूर्द करण्यात आला. याखेरीज बदलापूर येथील भाजप नगरसेवक संभाजी शिंदे यांनीही कळमकर कुटुंबाला ११ हजार रुपयांचा धनादेश दिला.
डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संतोष कळमकर यांचा आॅगस्टमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. एक महिना उलटूनही सरकारी मदत त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली नव्हती. त्यांच्या दोन्ही मुली सुपर्णा आणि ऐश्वर्या पदवीधर आहेत. परंतु कोरोनामुळे नोकरी मिळविणे लागलीच शक्य नव्हते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच, सरकारी स्तरावर दखल घेण्यात आली. सोमवारी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांच्या हस्ते कळमकर यांच्या पत्नी श्वेता आणि मुली सुपर्णा, ऐश्वर्या यांनी ५० लाखांचा धनादेश स्वीकारला.
बदलापूरचे नगरसेवक शिंदे यांनीही या कुटुंबाला मदत केली. सुपर्णा हिने अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात रूजू होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु भरती प्रक्रिया थांबल्याने तूर्तास ते शक्य नाही. यावर नगरसेवक शिंदे यांनी तुर्तास त्यांच्या बांधकाम व्यवसायात सुपर्णाला नोकरी दिली.
‘लोकमत’चे मानले विशेष आभार
कळमकर कुटुंबाने ‘लोकमत’चे विशेष आभार मानले. ‘लोकमत’च्या रूपाने आजही माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव आला, अशा शब्दांत मुलगी सुपर्णा हिने भावना व्यक्त केल्या. तर नगरसेवक शिंदे यांनीही ‘लोकमत’मुळे कळमकर कुटुंबीयांची व्यथा जाणता आली आणि त्यांना मदत करता आल्याची प्रतिक्रिया दिली.