CoronaVirus News : घराबाहेर जाणाऱ्या तरुणांमुळे मुले, ज्येष्ठांना होतेय कोरोनाबाधा! जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागल्याने चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 11:44 PM2021-04-14T23:44:49+5:302021-04-14T23:51:23+5:30
CoronaVirus News: पालघर जिल्ह्यात मार्च २०२० ते २४ मार्चदरम्यान १० वर्षाखालील ४५२ लहान मुले तर ४०० मुली असे एकूण ८५२ लहान बालकांना कोरोनाची लागण झाली असून १० ते २० वयोगटातील ९७८ मुले तर ७१५ मुली असा एकूण १ हजार ६९३ मुलांना लागण झाली आहे.
- हितेन नाईक
पालघर : कोरोनाच्या लाटेत घरातील तरुण मंडळी नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडत असल्याने त्यांच्यासोबत येणाऱ्या कोरोना विषाणूच्या संपर्कामुळे घरातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक बाधित ठरण्याचे प्रमाण वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, ५ ते ३० वयोगटातील ३ हजार ४३० छोटी मुले-तरुण, २ हजार ६१५ छोट्या मुली-तरुणी तर ज्येष्ठ २ हजार ४५७ पुरुष व १ हजार ५०२ महिला कोरोनाच्या विळख्यात अडकून पडल्याने उदरनिर्वाह आणि जीवघेण्या आजाराच्या कैचीत सापडलेल्या कुटुंब प्रमुखांची मानसिकता अडचणीत सापडली आहे.
पालघर जिल्ह्यात मार्च २०२० ते २४ मार्चदरम्यान १० वर्षाखालील ४५२ लहान मुले तर ४०० मुली असे एकूण ८५२ लहान बालकांना कोरोनाची लागण झाली असून १० ते २० वयोगटातील ९७८ मुले तर ७१५ मुली असा एकूण १ हजार ६९३ मुलांना लागण झाली आहे. २१ ते ३० वयोगटातील २ हजार तरुण तर १५०० तरुणी असे एकूण ३ हजार ५००, ३१ ते ४० वयोगटातील २ हजार २०० तरुण तर १ हजार ३५७ तरुणी असा एकूण ३ हजार ५५७ तरुण, ४१ ते ५० वयोगटातील १ हजार ७९९ रुण तर १ हजार १०० असा २ हजार ८९९ तरुण तर ५१ ते ६० वयोगटातील व्यक्तींपैकी १ हजार ४६० ज्येष्ठ पुरुष व्यक्ती तर ८३६ महिला असे एकूण २ हजार २९६, तर ६० ते ७० वयोगटातील ६७९ पुरुष तर ४६० महिला असे एकूण १ हजार १३९ रुग्ण, ७१ ते ८० वयोगटातील २६० पुरुष तर १६५ महिला असे एकूण ४२५ रुग्ण तर ८० वर्षावरील ५८ ज्येष्ठ पुरुष तर ४१ महिला असे एकूण ९९ ज्येष्ठ कोरोनाने बाधित झाले असल्याचे आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो.
५ वर्ष ते २२ वयोगटातील लहान मुले, तरुण शाळा कॉलेज बंद असल्याने घरात बसून ऑनलाइन अभ्यास करीत आहेत, तर दुसरीकडे ५८ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकही सेवानिवृत्ती आणि विविध आजारांनी त्रस्त असल्याने घरातच बसून असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी वरील दोन्ही वयोगटातील ६ ते ७ हजार व्यक्तींना कोरोनाने ग्रासल्याचे दिसून येत आहे.
बाहेरून घरात आल्यावर अशी घ्या काळजी
- नोकरी-रोजगार आदींसह काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांनी मास्कचा वापर करावा. तसेच कामावरून घरी आल्यावर घरात शिरताना सॅनिटायझरचा वापर करून स्वच्छ आंघोळ करावी.
- घरातील इतर सदस्यांना भेटताना, बोलताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे. कोरोनासदृश लक्षणे वाटल्यास घरातील खोलीत स्वतःला कोंडून घेत उपचार घ्यावेत.
- अंगातले कपडे गरम पाण्यात बुडवून धुण्यास ठेवावे. तसेच वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करून स्वत:ला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याची दक्षता घ्यावी.