CoronaVirus News: कारवाईच्या बडग्यानंतरही नागरिकांचा निष्काळजीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:04 AM2020-10-05T00:04:02+5:302020-10-05T00:04:16+5:30
मास्क न लावण्याकडे कल : १४ लाख ५२ हजारांचा दंड वसूल
कल्याण : सद्य:स्थितीला अनलॉकमध्ये सर्वच ठिकाणी बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले असताना सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क, रूमाल, कापड परिधान करणे बंधनकारक केले आहे. पण, बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे केडीएमसीच्या दैनंदिन कारवाईवरून स्पष्ट होत आहे. १४ दिवसांत तब्बल दोन हजार ९०५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १४ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शनिवारपर्यंत ही रुग्णसंख्या ४३ हजारांहून अधिक झाली आहे. ३८ हजार ८७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असले, तरी कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी आतापर्यंत ८४४ जणांचा मृत्यू ओढवला आहे. सध्याच्या अनलॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत असून त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. सोशल डिस्टन्सचेही तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या अनलॉकमध्ये जूनमध्ये आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी परिपत्रक काढून दुकानदार आणि नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना केल्या आहेत.
तसेच मास्क वापरण्यासंदर्भातल्या राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील दहाही प्रभागांत प्रभागक्षेत्र अधिकारी यांचे पथक आणि पोलिसांच्या सहकार्याने कारवाई सुरू आहे. जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहºयावर मास्क, रूमाल, कापड परिधान करणार नाहीत, अशांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. एप्रिल ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रशासनाने केलेल्या कारवाईत पाच लाखांचा दंड वसूल केला होता.