CoronaVirus News : कोरोनामुळे यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:47 AM2020-06-24T00:47:27+5:302020-06-24T07:08:13+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर गर्दी, समूह टाळावाच लागेल, हे लक्षात घेत दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचे महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने ठरवले आहे.
स्रेहा पावसकर
ठाणे : राज्यात गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले जात आहे. सोबतच दहीहंडी उत्सव साजरा न करण्याची गोविंदा पथकांची मानसिकता दिसत आहे. मोठ्या समूहाशिवाय दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकत नाही आणि कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर गर्दी, समूह टाळावाच लागेल, हे लक्षात घेत दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचे महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने ठरवले आहे.
गणेशोत्सवाइतकाच महत्त्वाचा दुसरा सण म्हणजे दहीहंडी. दहीहंडी उत्सवासाठी अनेक गोविंदा पथके साधारण महिनाभर आधीपासून सराव सुरु करतात. दुसरीकडे आयोजकही मोठ्या प्रमाणात आयोजन करुन थरांसाठी बक्षिसे जाहीर करतात. गेल्या काही वर्षात ठाण्यात तर लाखोंच्या हंड्या उभारल्या जाऊ लागल्या आणि त्या फोडून लाखमोलाचे लोणी खाण्यासाठी गोविंदा पथके सकाळीच ठाण्यात दाखल होत होती.
ठिकठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी आणि बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. मात्र यंदा कोरोनामुळे समूह एकत्र येईल अशा कार्यक्रमांना बंदी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. अशातच गर्दीशिवाय हा उत्सव होऊच शकत नाही, हे लक्षात घेत गोविंदा पथकांनी यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याची भूमिका घेतलेली आहे. ठाणे, मुंबई, नवीमुंबई, पालघर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, मीराभार्इंदर अशा शहरात मिळून जवळपास ८००-९०० गोविंदा पथके आहेत. या सर्वच पथकांनी उत्सव न करण्याचे ठरवले असून तसे समन्वय समितीला कळवले आहे.
यानुसार समितीनेही उत्सव रद्द करण्याचे ठरवले आहे. केवळ कृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी रात्री कृष्णजन्मसोहळा अगदी मोजक्या माणसांमध्ये आणि सोशल डिस्टन्स ठेवत करावा असे समितीने सर्व पथकांना कळवले आहे.
>गर्दी आणि समूहाशिवाय दहीहंडी उत्सव साजरा होऊच शकत नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हा उत्सव कोणीही साजरा करूच शकत नाही. आम्ही गोविंदा पथकांकडून याबाबत मत मागविले होते आणि जवळपास सर्व मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करण्याची भूमिका मांडली आहे. त्यानुसार, केवळ कृष्णजन्मोत्सव सोशल डिस्टन्स ठेवत साजरा करण्याचे आम्ही त्यांना सुचविले आहे आणि दहीहंडी उत्सव रद्द करणार आहे. येत्या दोन दिवसांत तसे अधिकृतरीत्या जाहीर केले जाणार आहे.
- समीर पेंढारे, उपाध्यक्ष,
महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समिती