CoronaVirus News: ‘कोरोनाचा १५ दिवसांत एकही रुग्ण नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:40 AM2020-08-13T00:40:14+5:302020-08-13T00:40:22+5:30
मनपा हद्दीतील झोपडपट्ट्या, चाळवजा वस्ती येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त होते. मात्र, १५ दिवसांत तेथे एकही रुग्ण आढळलेला नाही
कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हॉटस्पॉट असलेले भाग क्वारंटाइन झोन म्हणून घोषित केले होते. मात्र, मागील १५ दिवसांत ४५ विभागात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. ही समाधानकारक बाब असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
मनपा हद्दीतील झोपडपट्ट्या, चाळवजा वस्ती येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त होते. मात्र, १५ दिवसांत तेथे एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यात प्रामुख्याने क्रांतीनगर, ज्योतीनगर आदी चाळ व झोपडीपट्टी प्रभाग आहेत. त्यामुळे हे प्रभाग हॉटस्पॉटच्या यादीतून वगळले आहेत.
सध्या दिवसाला अॅण्टीजेनच्या ७०० टेस्ट केल्या जात आहेत. तर, आतापर्यंत आठ हजार ३८१ जणांची अॅण्टीजेन टेस्ट केली आहे. फॅमिली डॉक्टर कोविड फायटर संकल्पनेला खाजगी डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत आहे. या डॉक्टरांनी आतापर्यंत चार हजार ३०० जणांची अॅण्टीजेन टेस्ट केली आहे. अॅण्टीजेन व स्वॅब अशा दोन्ही प्रकारच्या टेस्ट मिळून ५७ हजार ८२८ जणांची टेस्ट केली आहे. स्वॅब टेस्टींगचे प्रमाण हे ८६ टक्के तर, अॅण्टीजेन टेस्टचे प्रमाण १४ टक्के आहे. दर, दिवसाला एक हजार अॅण्टीजेन टेस्ट व दीड हजार स्वॅब टेस्ट करण्याचे उद्दीष्ट असून, त्या माध्यमातून कोरोना शून्य रुग्ण संख्येवर आणण्याचे ध्येय ठेवले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आठ जणांचा मृत्यू
केडीएमसी हद्दीत बुधवारी कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ४६६ झाली आहे. दुसरीकडे नवीन ३६८ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २२,२१७ वर पोहोचली आहे. सध्या चार हजार १९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत १८,५६१ रुग्ण बरे झाले आहेत. २४ तासांत २३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेतील अग्निशमन दलाच्या बंबावरील चालक व परिवहन उपक्रमातील वाहक या दोघांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.