CoronaVirus News : लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 08:31 PM2021-04-02T20:31:38+5:302021-04-02T20:32:03+5:30
CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथ आणि बदलापुरात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
- पंकज पाटील
अंबरनाथ : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. अशातच ही नवी लाट लहानग्यांसाठी जास्त धोकादायक असल्याचे समोर आले असून त्यामुळे समस्त पालकवर्गाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथ आणि बदलापुरात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. (CoronaVirus News: Corona infection among children increases!)
कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जाता आहेत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणं सुद्धा दिसून येत आहेत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्या ही या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आढळून येत आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरत आहेत.
यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती. मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा जास्त असल्याने मुलं लवकर बरी होत होती. मात्र नव्या कोरोनामध्ये होत असलेले जुलाब, उलट्या हे त्रास लहान मुलांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांची आकडेवारी पाहता बदलापूर शहरात मागील ३ महिन्यात ४०१ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील ८८, सहा ते दहा वयोगटातील ९६, अकरा ते पंधरा वयोगटातील ११३, तर सोळा ते वीस वयोगटातील १०४ लहान मुलांचा समावेश आहे. तर अंबरनाथमध्येही मागील दोन महिन्यांत २१५ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील २२, सहा ते दहा वयोगटातील ४४, अकरा ते पंधरा वयोगटातील ६२, सोळा ते वीस वयोगटातील ८७ लहान मुलांचा समावेश आहे. या नव्या आकडेवारीमुळे पालकांच्या चिंतेत भर पडणार असली, तरी मुलांची काटेकोरपणे काळजी घेणे ग हाच यावरील सर्वोत्तम उपाय असल्याचंही डॉक्टर सांगतात.