CoronaVirus News: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यात यश आले असले तरी गाफील राहू नका; उध्दव ठाकरेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 05:13 PM2020-08-24T17:13:20+5:302020-08-24T17:16:55+5:30
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोना बाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते.
ठाणे : कोरोना रोखण्यासाठी ज्या काही उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्या निश्चितच चांगल्या आहेत. कोरोना रुग्णांची घटणारी संख्या, उपचार करुन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या यावरुन ठाण्याने कोरोनाचे संकट रोखण्यासाठी केलेले उपाय हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. तसेच यापुढेही गाफील राहू नका. कोरोनाचा प्रादरुभाव पुन्हा वाढू शकतो, सणांचे दिवस आहेत. त्यामुळे काळजी घ्या अशा सुचनाही उद्धव ठाकरे यांनी केल्या आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोनाबाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे, ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे सल्लागार अजोय मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आरोग्य विभागाचे अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदींसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोरोना बाबत ठाण्याने जी काही काम केले आहे, त्याबाबत समाधान असल्याचे सांगितले.
यावेळी महापालिका आयुक्तांनी सुरवातील कोरोना बाबत कशा बाबत उपाय योजना केल्या, कोविड केअर सेंटरचा कसा फायदा झाला या विषयीचे सादरीकरण केले. त्यानंतर मुंब्रा पॅटर्न कसा यशस्वी केला या बाबत मुख्यमंत्र्यांनी सवाल केला असता, त्या ठिकाणी कशा पध्दतीने उपाय योजना केल्या. रुग्णांचा शोध कशा पध्दतीने घेतला गेला, या विषयीची माहिती सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांनी त्यांना दिली. ठाण्यात आल्यानंतर समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना प्रार्दुभाव रोखण्यात ठाण्याने यश मिळविले आहे. त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु गाफील राहू नका, सणांचे दिवस आहे. परंतु, प्रादुर्भाव वाढू शकतो, आपल्याला थांबायचे नाही, कोरोना विरुध्दचा हा लढा सुरुच ठेवायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा मी जेव्हा ठाण्यात येईन तेव्हा ठाणे कोरोनामुक्त झालेले मला नक्कीच आवडेल, असेही त्यांनी सांगितले.
CoronaVirus News: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यात यश आले असले तरी गाफील राहू नका; उध्दव ठाकरेंचे आवाहन pic.twitter.com/OaFgqBirIq
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2020
मुंब्रा पॅटर्न बाबत समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार मुंब्रा पॅटर्नही इतर भागात राबविण्यात यावा, झोपडपटटी भागात ज्या पध्दतीने कोरोना रोखण्यात यश आले आहे, तसेच इमारतींमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचनाही त्यांनी केल्या. यासाठी जे काही सहकार्य लागेल ते सांगा, निधी हवा असेल तर तो देखील देऊ आणि कोरोना प्रादुर्भाव रोखा अशा सुचनाही त्यांनी केल्या. कोरोना बाबत नागरीकांमध्ये जनजागृती करा, सणा सुदीचे दिवस आहेत, त्यानुसार या काळात कशी काळजी घेतली गेली पाहिजे याची माहिती देखील नागरीकांना द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर कोरोना दक्षता समिती ही प्रत्येक वॉर्डात स्थापन करावी अशी सुचनाही त्यांनी दिली.
लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे, दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र यामुळे गाफील राहून चालणार नाही, सतर्क राहावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करावा, वैयक्तीक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे आहे. याशिवाय पावसाळी आजारांकडेही दुर्लक्ष करु नका अशा सुचनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या आहे.