CoronaVirus News: पालघरच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:54 AM2020-06-14T00:54:42+5:302020-06-14T00:54:49+5:30
रुग्णसंख्या दीडशेहून अधिक; नागरिकांमध्ये घबराट
विक्रमगड/वाडा : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि वाडा या दोन तालुक्यांसह ग्रामीण भागामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून पावसाळा सुरू झाल्याने आणखीनच चिंता वाढली आहे. या दोन्ही तालुक्यांसह ग्रामीण भागातील रुग्णांनी दीडशतक पार केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
विक्रमगड तालुक्यातील बाधितांची संख्या ४७ वर पोहोचली असून वाडामध्येही रुग्णसंख्या ६० वर, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ७० च्या पुढे गेली आहे. विक्रमगड तालुक्यात १० दिवसांपूर्वी एकही रुग्ण नव्हता, मात्र काही दिवसांपूर्वी १४ वर्षाच्या मुलाला कोरोना संसर्ग झाला होता.
त्याला मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निकट संपर्कातील ४२ जणांना शिळ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यातील त्यांचे सर्वांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शुक्रवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ३३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रु ग्ण संख्या ४७ झाल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.
या ३३ पॉझिटिव्ह रुग्णांचा निकट संपर्क आलेल्यांची यादी बनवण्याचे काम सुरू असून त्यांना क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. या पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.वाडामध्येही रुग्णसंख्येने अर्धशतक गाठले आहे. तालुक्यात शुक्रवारी रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या ६० वर गेल्याने भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी भावेघर येथे १३, वाडा ३ असे १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. या रुग्णांना पोशेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली.
ग्रामीण भागात चिंता
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागांतही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची संख्या दीडशतकापार गेली असल्याने चिंंता वाढली आहे.