CoronaVirus News : मुंबईच्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनावरील उपचार खर्च साडेपाच लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 01:02 AM2020-05-18T01:02:03+5:302020-05-18T01:02:36+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबईतील एका माजी सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात एकूण आठ जण कोरोनाबाधित निघाले. या अधिकाºयाचा मुलगा आणि सून दोघेही पोलीस खात्यात शिपाई आहेत.
ठाणे : दोन दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या मुंबईतील माजी सहायक पोलीस उपनिरीक्षकास ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलने अव्वाच्या सव्वा बिल लावल्याचा आरोप करत, त्यांच्या नातेवाईकांनी मनसेकडे धाव घेतली. मनसेने वेदांत हॉस्पिटलला याबाबत जाब विचारला; मात्र हा खर्च देण्याची तयारी मुंबई पोलीस दलाने दर्शवली असून, तसा ईमेलही पाठवल्याने आपण बिलाचे पैसे मागितले नसल्याचे स्पष्टीकरण हॉस्पिटलने रविवारी दिले.
मुंबईतील एका माजी सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात एकूण आठ जण कोरोनाबाधित निघाले. या अधिकाºयाचा मुलगा आणि सून दोघेही पोलीस खात्यात शिपाई आहेत. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत होते. माजी पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला ठाण्यातील घोडबंदर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १५ मे रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या पत्नीचे बील तीन लाखांच्या घरात आणि त्यांचे बिल साडेपाच लाख रुपये झाले. त्यांच्या मुलांनी तीन लाख भरले. मात्र त्यांनतरही साडेपाच लाखांचे बिल हातात आले. त्यामुळे त्यांनी रविवारी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या पदाधिकाºयांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला जाब विचारुन बिल माफ करण्याची मागणी केली. याबाबत हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अब्रार खान यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत गैरसमज पसरविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मृत पोलीस अधिकाºयाचे नातेवाईक म्हणाले की, हॉस्पिटलने अव्वाच्या सव्वा बिल लावले. ते आम्हाला परवडणारे नव्हते. म्हणूनच आम्ही मनसे पदाधिकाºयांकडे तक्रार केली होती.
मुंबई पोलीस दलाचे माजी पोलीस अधिकारी १६ दिवस आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे इतके बिल येणारच. त्यांचे साडेपाच लाख रुपये बिल झाले होते. त्यातील ५0 हजार रुपये नातेवाईकांनी जमा केले. त्यांना एक लाखाची सूट देऊन चार लाख भरायचे होते. त्यांच्या नातेवाईकांना बिल दाखवले होते. त्याचवेळी मुंबई पोलिसांकडून १५ मे रोजी आम्हाला ईमेल मिळाला. त्यात संपूर्ण बिल मुंबई पोलीस भरेल, त्यांच्याकडे मागू नका, असे म्हटले होते. त्यामुळे आम्ही पैसे मागितले नाही.
- डॉ. अब्रार खान, मुख्य कार्यकारी अधिकारी, वेदांत हॉस्पिटल