CoronaVirus News: कोविड साहित्य खरेदीच्या प्रकरणात दिरंगाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:53 PM2020-10-06T23:53:39+5:302020-10-06T23:53:49+5:30
राजकीय दबाव; पुरावे मिळाल्यानंतर कारवाई
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यालयातील महत्वाच्या फाइल्स आणि संगणक चोरी प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. सात अनधिकृत बांधकामांच्या तर दोन कोविड साहित्य खरेदीच्या फाइल्स चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. तरीही शीळ-डायघर पोलिसांकडून कारवाईमध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप होत असून, यामध्ये राजकीय दबाव आहे की काय, अशीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
दिवा प्रभाग समिती कार्यालयातील चोरी प्रकरणामध्ये अनधिकृत बांधकामांच्या सात, तर कोविडसाठी खरेदी केलेल्या साहित्याच्या दोन फाइल्स गायब झाल्या आहेत. या प्रकरणातील साक्षीदारांना धमकीचे प्रकार सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे साक्षीदारांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या ज्या दिवशी बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री संगणक आणि फाइल्स चोरीला गेले. यावेळी दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात तत्कालीन सहायक आयुक्त डॉ. मोरे आल्याची नोंद सुरक्षा रक्षकांनी केली होती. त्यानंतर, सहायक आयुक्त महेश आहेर यांनी ठाणे महापालिकेच्या वतीने मोरे आणि फिरोज खान या दोघांविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. यातून अनेक महत्त्वाची प्रकरणे बाहेर येण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.