CoronaVirus News: चाचण्या वाढवूनही ठाण्यात नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:04 AM2020-10-10T01:04:14+5:302020-10-10T01:04:25+5:30

पालिकेच्या प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, मृत्युदरात घसरण

CoronaVirus News: Despite increasing tests, the number of new cases in Thane has come down | CoronaVirus News: चाचण्या वाढवूनही ठाण्यात नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण घसरले

CoronaVirus News: चाचण्या वाढवूनही ठाण्यात नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण घसरले

Next

- अजित मांडके 

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचण्यांचे दिवसाचे प्रमाण वाढवून ७,७०० च्या घरात आले आहे. दुसरीकडे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण नऊ टक्क्यांनी घटले आहे. यापूर्वी नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण २० टक्क्यांवर पोहोचले होते. ते आता ११ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवरून ८८.२० टक्कयांवर आले आहे.

ठाण्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८८ दिवसांवर आला आहे. मृत्युदर २.६४ टक्के आहे. विशेष म्हणजे ठाणे महापालिका नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकांपेक्षा अ‍ॅण्टीजेन टेस्ट करण्यातही पुढे असून हा आकडा दिवसाकाठी ७७०० च्या घरात आला आहे. सप्टेंबर महिन्यात १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले, तरी आठ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत ३९ हजार ६९४ केसेस आढळल्या आहेत. त्यातील ३५ हजार ०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ३६३५ एवढी आहे.

आतापर्यंत महापालिका हद्दीत कोरोनामुळे १०४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मृत्युदर हा ५.२० टक्क्यांच्या आसपास होता. तो आता २.६४ टक्क्यांवर आला आहे. राज्याचा मृत्युदर हा २.६६ टक्के असून ठाण्याने मृत्युदरही रोखण्यात यश मिळविले आहे. आतापर्यंत तीन लाख ७० हजार ७०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात ३९ हजार ६९४ रुग्ण आढळले आहेत.

३६३५ रुग्णांवर ठाण्यात उपचार सुरू
सध्या उपचार घेतलेल्या ३६३५ रुग्णांमध्ये लक्षणे असलेले रुग्ण १४५३ व लक्षणे नसलेले रुग्ण १९०६ आहेत. गंभीर रुग्ण २७६ असून आयसीयूमध्ये १६७, व्हेंटिलेटरवर १०९, पालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये १६११, होम क्वारंटाइन १६३३ आहेत.

मृत्युदर कमी करणे, डिस्चार्ज रेट, चाचण्या वाढविणे आदींवर काम करीत आहोत. त्यामुळे मृत्युदर कमी झालेला आहे. प्रत्येक  रुग्णाची माहिती घेतली जात आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केल्यामुळेच शहराचे चित्र बदलले.
- डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका
 

Web Title: CoronaVirus News: Despite increasing tests, the number of new cases in Thane has come down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.