Coronavirus News: ठाण्यातील कोरोना बाधित वकीलांसाठी जिल्हा संघटनेने जमा केला दहा लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 01:02 AM2020-06-30T01:02:34+5:302020-06-30T01:07:40+5:30
ठाणे जिल्हयात आतापर्यंत दहा वकिलांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर ठाणे शहरातील दहा वकिल हे कोरोनाशी लढा देत आहेत. दोन वकिलांनी कोरोनावर मात केली. पण त्यांना लाखोंची बिले हातात पडली. अशावेळी आपल्या सहकाऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ठाणे जिल्हा वकिल संघटनेने पुढाकार घेतला आहे. राज्यातील असा पहिलाच उपक्रम असून संघटनेने आतापर्यंत दहा लाखांचा निधी जमा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: जिल्हयात आतापर्यंत दहा वकिलांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून सध्या दहा वकिलांना बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित वकीलांबरोबरच गरजू वकीलांसाठी ठाणे जिल्हा वकील संघटनेने वेळीच सकारात्मक पाऊल उचलून एक अनोखा उपक्र म हाती घेतला आहे. नामांकित वकिलांनी मोठया रक्कमा देण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच जवळपास दहा लाखांचा निधी जमा झाला आहे. या उपक्र मांतर्गत २५ लाखांचा निधी उभारण्याचे उदिष्ट संघटनेने डोळयासमोर ठेवेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अशाप्रकारे कोरोनासारख्या संकटाच्या काळात आपल्याच सहकाऱ्यांच्या मदतीसाठी धाऊन जाणारी ठाणे जिल्हा वकील संघटना ही राज्यातील पहिलीच संघटना ठरणार आहे. ठाणे जिल्हा वकील संघटनेने कोरोना बाधीत वकील तसेच गरजू वकिलांना मदतीसाठी २८ जून रोजी एका विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी सभासदांनी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रशांत कदम यांच्या आवाहनाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देऊन एक मोठा निधी उभारण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये दहा लाख रु पयांपेक्षा अधिक निधी जमा करुन गरजू सहकाºयांच्या प्रती जबाबदारीची जाणीव वकीलांनी व्यक्त केली. यावेळी अॅड. कदम यांनी स्वत: दिड लाख रुपयांचे योगदान देण्याचे घोषित केले. त्यापाठोपाठ ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण, अॅड. शैलेश सडेकर यांनी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. निधी उभारण्यासठी कनिष्ठ वकील सभासदांनीही यथाशक्ती आपले योगदान दिले.
या सभेमध्ये कोरोनावर मात केलेल्या दोन वकिलांचाही समावेश होता. त्यांच्यापैकी एकाला संपूर्ण कुटूंबासह सात लाखांचा खर्च सोसावा लागला. त्यामुळेच सर्वांनी अशी मदत जमा करण्याचा निश्चय केला. सभेत १३३ सदस्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील ८० वकिलांनी मदतीचा हात पुढे केला. या सभेला अनुपस्थित ज्येष्ठ तसेच कनिष्ठ वकिलांना या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याद्वारे एक मोठा निधी उभारण्यात येईल. हा निधी ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या जवळपास चार हजारांहून अधिक वकील सभासदांसाठी उपयोगात आणला जाणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
‘‘ठाणे शहरात दहा वकील कोरोनामुळे बाधित असून जिल्हयात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यु झाला आहे. रुग्णालयाच्या बिलासाठी मोठी रककम कशी जमा करणार हा कनिष्ठ वकिलांपुढे प्रश्न होता. त्यामुळे कोरोनाबाधितांनी आवाहन केल्यानंतर अशी मदत उभी करण्याचे ठरले. अशा प्रकारे वकीलांसाठी मदत उभा करण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. ’’
अॅड. प्रशांत कदम, अध्यक्ष, ठाणे शहर वकील संघटना