CoronaVirus News : अंबरनाथमध्ये कोरोनाची पहिली लस घेणाऱ्या डॉक्टरच कोरोना पॉझिटिव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 11:03 PM2021-03-30T23:03:31+5:302021-03-30T23:04:34+5:30
CoronaVirus News: लसीकरणाच्या मोहिमे दरम्यान दररोज दोनशे ते अडीचशे नागरिक दररोज लस घेत आहेत.
- पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या डॉक्टर यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या डॉक्टरांना लस देऊन कोरोना लसीकरणाचा शुभारंभ अंबरनाथमध्ये करण्यात आला होता, त्या डॉक्टरांनी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. (CoronaVirus News: Doctors who took the first corona vaccine in Ambernath, are corona positive!)
अंबरनाथ व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी वाडेकर यांनी कोरोना संकट काळात फ्रंट लाईनवर राहून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. कोरोना संकट काळात झपाटून काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी यांना कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान पहिली लस घेण्याचा मान देण्यात आला होता. डॉक्टर शुभांगी यांना ही लस देत मोठ्या उत्साहात लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. ही लस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरी लास देखील त्यांनी घेतली.
पहिली लस घेऊन पन्नास दिवस उलटल्यानंतर त्या स्वतःला सुरक्षित समजत होत्या. कोरोनाची लस घेतल्यावर कोरोनाची लागण होणार नाही अशी समजूत प्रत्येकाला होती. मात्र डॉक्टर शुभांगी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आता आश्चर्य व्यक्त होत आहे. डॉक्टर शुभांगी यांना कोरोनाची लक्षणे आढळत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट करून घेतली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी एका खाजगी रुग्णालयात उपचार देखील सुरू केले आहेत.
दरम्यान, ज्या डॉक्टरांनी कोरोनाची पहिली लस घेऊन लसीकरणाचा शुभारंभ केला होता, त्याच डॉक्टरांना पुन्हा कोरोना झाल्यामुळे या लसीबाबत लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लसीकरणाच्या मोहिमे दरम्यान दररोज दोनशे ते अडीचशे नागरिक दररोज लस घेत आहेत, मात्र, लसीचे दोन डोस झाल्यानंतरही ते शंभर टक्के सुरक्षित राहतील याची हमी आता कोणीही देऊ शकत नाही, हे डॉक्टर शुभांगी यांच्या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे.