CoronaVirus News : ठाण्यातील प्रदूषणात कमालीची घट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 01:12 AM2020-06-23T01:12:29+5:302020-06-23T01:12:36+5:30
CoronaVirus News : शहरातील विविध चौकांचा समावेश असलेल्या तीनहातनाका गटाचा समावेशदेखील ग्रीन झोनमध्ये झाला आहे. येथील हवा केवळ ११ टक्केच प्रदूषित असल्याचे आढळले आहे.
ठाणे : कोरोना रुग्ण दरवाढीचा वेग १० दिवसांवरून २९ दिवसांवर आल्यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला असतांना हवेतील प्रदूषणातही कमालीची घट झाली आहे. ठाण्यातील काही भागांची हवा ही आता अतिशुद्ध झाल्याने हे परिसर आता ग्रीन झोनमध्ये समाविष्ट झाले आहेत. यात शहरातील विविध चौकांचा समावेश असलेल्या तीनहातनाका गटाचा समावेशदेखील ग्रीन झोनमध्ये झाला आहे. येथील हवा केवळ ११ टक्केच प्रदूषित असल्याचे आढळले आहे.
हवेतील प्रदूषणात झालेली कमालीची घट ही ठाणेकर नागरिकांसाठी आनंदाची बाब मानली जात आहे. मागील काही वर्षांत ठाण्यातील एखाद्या भागाचे अशा प्रकारे हवेच्या गुणवत्तेत ग्रीन झोनमध्ये समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लॉकडाऊनच्या काळात ठाण्यातील हवेतील प्रदूषणात बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. परंतु, अनलॉकनंतर शहरातील प्रदूषणात पुन्हा वाढ होईल, असे चित्र होते. अनलॉकमध्ये ठाण्यातील रस्त्यांवर वाहने धावण्यास सुरुवात झाल्यानंतरही शहरातील प्रदूषणात कमालीची घट झाली आहे.
सोमवारी २२ जूनला दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी ठाणे महापालिका हद्दीत प्रदूषणात ७१ टक्क्यांची घट झाली असून शहरातील हवा सरासरी २९ टक्केच अशुद्ध असल्याने मध्यम शुद्ध पिवळ्या गटात नोंदली गेली आहे. परंतु, ठाण्याच्या इतिहासात प्रथमच या गटात ११ टक्केच हवा प्रदूषित असल्याने त्याचा हिरव्या गटात समावेश झाला आहे.
>१६ चौकांत प्रदूषणाचे प्रमाण हे ११ टक्के
तीनहातनाका गटात शहरातील महत्त्वाच्या १६ चौकांमधील प्रदूषणाची मोजणी ही या अंतर्गतच केली जाते. त्यानुसार, या येथे प्रदूषणाचे प्रमाण हे ११ टक्केच आहे. त्यामुळे शहरातील विविध नाक्यांवरील हवा आता शुद्ध झाली असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. औद्योगिक परिसरातील रेप्टाकॉस ब्रेट अॅण्ड कंपनीअंतर्गत वागळे इस्टेट, शास्त्रीनगर आदी ठिकाणीही हवेतील प्रदूषणात मागील काही दिवसांत कमालीची घट झाली असून येथे तर ३० टक्के हवा प्रदूषित आढळली आहे.
>संपूर्ण शहर पिवळ्या गटात, कोपरीत ४0 टक्के प्रदूषण
निवासी परिसर असलेल्या कोपरी प्रभाग कार्यालय, येथे ४० टक्के हवा प्रदूषित आढळली असल्याची नोंद झाली आहे. व्यावसायिक परिसर असलेल्या शाहू मार्केट नौपाडा परिसरात सर्वाधिक ३५ टक्के हवा प्रदूषित असल्याची नोंद झाली आहे. पालिकेच्या प्रदूषण विभागामार्फत केलेल्या या सर्वेक्षणात २२ जूनला दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी ही हवेतील शुद्धता नोंदली गेली आहे. तर, संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत सरासरी २९ टक्के हवा आता प्रदूषित असल्याने संपूर्ण शहराचा पिवळ्या गटात समावेश करण्यात आला आहे.