CoronaVirus News: लॉकडाऊनची भीती अन् गावकीच्या निवडणुकीसाठी मजुरांचा परतीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:44 PM2021-04-08T23:44:22+5:302021-04-08T23:44:50+5:30

गावच्या पुढाऱ्यांनी केली वाहन व्यवस्था : माजीवडा उड्डाणपुलाखाली गर्दी, आणखी लोंढे वाढण्याची शक्यता

CoronaVirus News: Fear of lockdown Workers return home for village elections | CoronaVirus News: लॉकडाऊनची भीती अन् गावकीच्या निवडणुकीसाठी मजुरांचा परतीचा प्रवास

CoronaVirus News: लॉकडाऊनची भीती अन् गावकीच्या निवडणुकीसाठी मजुरांचा परतीचा प्रवास

Next

ठाणे : लॉकडाऊनमुळे ठाण्यातील माजीवडानाक्याजवळील मुंबई-नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलाखाली परराज्यातील नागरिकांची परतीच्या प्रवासासाठी हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली. तेथे कोणत्याही प्रकारे कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन होताना दिसत नाही. त्यातच उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून या मजुरांना तेथील स्थानिक पुढाऱ्यांनी गावी बोलावून त्यासाठी वाहनांची व्यवस्थाही केल्याने हे लोंढे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन होईल आणि पुन्हा भुकेने जीव जाण्यापेक्षा गावी जाणे सोयीचे आहे. गावी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनातून जाण्याचा चंग बांधून परराज्यातील काही तरुण, वयोवृद्ध आपल्या बायकामुलांसह मोठ्या प्रमाणात जमले असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे महाबळेश्वर येथून काही जण ठाण्यात उत्तर प्रदेशात जाण्यासाठी उतरले आहेत. परंतु, ठाण्यातील नाशिक-मुंबई महामार्गावर होणाऱ्या या गर्दीकडे मात्र महापालिका आणि पोलीस यंत्रणांकडून दुर्लक्ष होत आहे.

गतवर्षी ही लॉकडाऊन झाल्यावर परराज्यातील नागरिक मिळेल त्या वाहनांनी वेळप्रसंगी पायी आपले गाव गाठणे पसंत केले होते. त्यानंतर कोरोना कमी झाल्यावर या मजुरांनी मुंबई ठाण्याची वाट धरली. मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने मिनी लॉकडाऊन केले आहे. त्याचा परिमाण हळूहळू होताना दिसत आहे. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्यांचे कामधंदे बंद झाल्याने पुन्हा उपासमारीची वेळ येईल, त्यापेक्षा आधीच गावी जाणे या मजुरांनी पसंत केल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. त्यामुळे ठाण्यातील माजीवडाजवळील उड्डालपुलाखाली उत्तर प्रदेश ला जाणा:या मजुरांची गर्दी वाढत आहे. उत्तरप्रदेश येथे निवडणूक असल्याने या मजुरांना तेथील स्थानिक पुढाऱ्यांनी गावी बोलवले आहे. त्यांना नेण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही केली आहे. त्यामुळे येथे गर्दी वाढू लागल्याचे चित्र आहे. या वाढत्या गर्दीमध्ये येथे कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. हे प्रमाण असेच वाढत राहिल्यास ठाण्यातील कोरोना कसा नियंत्रणात येईल, असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या वाढत्या गर्दीकडे पोलीस, जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

हॉटेल बंद झाल्याने हॉटेल मालकाने गावी जाण्यास सांगितले, त्यामुळे महाबळेश्वर येथून इतर वाहनांनी ठाण्यात आलो. जवळपास १९ जण महाबळेश्वर येथून आलो आहेत. आता येथून मिळेल त्या वाहनाने उत्तर प्रदेश गाठायचे आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास करायचे काय हाच प्रश्न आहे. 

मागील ३० ते ३५ वर्षे झाले ठाण्यात गॅरेजमध्ये काम करतोय. पण सध्या लॉकडाऊन झाल्याने हाताला काम नाही. म्हणून येथे उपाशी मरण्यापेक्षा गावी जात आहे. माजीवडा येथून उत्तर प्रदेशला मिळेल त्या वाहनामधून कुटुंबासह जात आहे. परिस्थिती सुधारल्यास पुन्हा ठाण्यात नोकरीसाठी येऊ.    
    - नंकू यादव, मजूर

Web Title: CoronaVirus News: Fear of lockdown Workers return home for village elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.