Coronavirus News: महिला पोलीस उपनिरीक्षकाने प्लाझ्मा दान केल्याने कोरोनाबाधित वृद्धेला जीवदान
By जितेंद्र कालेकर | Published: October 6, 2020 01:04 AM2020-10-06T01:04:54+5:302020-10-06T02:21:56+5:30
ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दीपाली लंबाते यांनी शनिवारी एका ७५ वर्षीय वृद्धेला आपला प्लाझ्मा दान करुन पोलीस आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कोणाला तरी जीवदान मिळत असेल तर नक्कीच प्लाझ्मा दानाचीही जनजागृती व्हायला हवी, अशी प्रतिक्रीया लंबाते यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनावर मात केल्यानंतर कोपरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली लंबाते यांनी शनिवारी एका ७५ वर्षीय वृद्धेला आपला प्लाझ्मा दान करुन पोलीस आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे कोरोना योद्धा लंबाते यांचे पोलीस वर्तुळात कौतुक होत आहे.
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील एका महिला पोलीस कर्मचारी यांची आई भामाबाई अवघडे यांच्यावर घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान त्यांना पॉझिटिव्ह या प्लाझ्माची गरज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. या नातेवाईकांनी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी सचिन रावराणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कोपरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक लंबाते यांच्याकडे प्लाझ्माबाबत विचारणा केली. लंबाते यांनी लागलीच प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर ठाण्यातील नौपाडा येथील ब्लडलाईन या ब्लड बँकेत जाऊन त्यांनी प्लाझ्मा दान केले. त्यांचा प्लाझ्मा वेदांत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भामाबाई (७५) यांना देण्यात आला. लंबाते यांनी वेळीच प्लाझ्मा दिल्यामुळे भामाबाई यांच्यावरील उपचारांसाठी चांगली मदत झाली. त्यामुळे अवघडे कुटुंबीयांनी उपनिरीक्षक दीपाली लंबाते यांचे तसेच त्यासाठी प्रयत्न करणारे रावराणे यांचेही आभार मानले आहेत.
‘‘ कोरोनावर मात केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. याआधीही मला पोलीस आयुक्तांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी विचारणा केली होती. गैरसमजामुळे प्लाझ्माचे दान कोणी करीत नाही. प्लाझ्मा दान केल्याने कोणाला तरी जीवदान मिळत असेल तर नक्कीच प्लाझ्मा दानाचीही जनजागृती व्हायला हवी.’’
दीपाली लंबाते, पोलीस उपनिरीक्षक, कोपरी पोलीस ठाणे