CoronaVirus News : आधी लढा कोरोनाशी, मग निवडणुकीशी, नेत्यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:02 AM2020-06-25T01:02:14+5:302020-06-25T01:02:20+5:30
CoronaVirus News : ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता असली तरी निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
अंबरनाथ/बदलापूर : कोरोनाचा प्रभाव एवढा वाढला आहे की त्याच्यासोबत लढत असताना अंबरनाथ आणि बदलापूरमधील नेत्यांना पालिका निवडणुकीचा विसर पडला आहे. निवडणूक लागेल तेव्हा बघू अशी भूमिका राजकीय मंडळींनी घेतली आहे. कल्याण- डोंबिवली महापालिकेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होणे अपेक्षित आहे. ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता असली तरी निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. हे आदेश देत असताना निवडणूक आयोगाला अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिकेच्या निवडणुकींचा विसर पडल्याचे दिसते. या दोन्ही शहरांच्या निवडणुका मे महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाचा प्रभाव वाढल्याने त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही निवडणूक होणार कधी याची निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नेतेही कोरोनाशी लढण्यात व्यस्त असल्याने त्यांनीही निवडणुकीचे स्वप्न डोक्यातून बाजूला ठेवले आहे. निवडणुका लागतील तेव्हा बघून घेऊ अशा भूमिकेत दोन्ही शहरातील राजकारणी आहेत. सध्या नागरिकांचा जीव महत्त्वाचा असून निवडणुका नाही झाल्या तरी फरक पडत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
>आज परिस्थिती निवडणुकीची नसून कोरोनाशी सामना करण्याची आहे. आज राजकीय पक्षातील प्रत्येक पदाधिकारी आपापल्या परीने या लढाईत सहभागी झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत निवडणुकीचा विचार करणे चुकीचे आहे.
- प्रदीप पाटील, अध्यक्ष, अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस
>ही वेळ निवडणुकीचा विचार करण्याची नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोरोनाचा प्रभाव कमी करण्याकडे लक्ष देण्याची आहे. आज आमचे सर्व पदाधिकारी कोरोनाशी लढण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या डोक्यात निवडणुकीचा विचार नाही.
- वामन म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख, बदलापूर