CoronaVirus News: ठाण्यातील पहिला पॉझिटिव्ह ठणठणीत; स्वत:सह कुटुंबाचीही घेतोय काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 11:51 PM2020-12-15T23:51:34+5:302020-12-15T23:51:53+5:30
आरोग्य यंत्रणेचे मानले आभार : नागरिकांना नियम पाळण्याचे केले आवाहन
- अजित मांडके
ठाणे : कोरोना आता कमी होताना दिसत आहे, परंतु ठाण्यात पहिला रुग्ण १२ मार्चला आढळला होता. आता हा रुग्ण ठणठणीत असून, तो स्वत:सह आपल्या कुटुंबाचीही तेवढीच काळजी घेत आहे, तसेच इतरांनाही कोरोनापासून वाचण्याचे उपाय सुचवित आहे. मात्र, त्याच्या मनात आजही कोरोनाची भीती घर करून आहे.
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर २० दिवस उपचार करण्यात आले. तो ३१ मार्चला ठाण्यात घरी आला होता, परंतु उपचारानंतरही त्याला व त्याच्या कुटुंबांला रुग्णालय प्रशासनाने १४ दिवस होम क्वारंटाइन केले होते. कस्तुरबा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट १२ मार्चला पॉझिटिव्ह आला. रुग्णालयात डॉक्टर येऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस करीत होते. त्यानंतर, काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढली व डॉक्टरांवरील ताणही वाढला, परंतु त्यातून रुग्णालय प्रशासनाकडून योग्य वेळी औषध, गरम पाणी देणे, जेवणाचे डबे पुरविणे अशा सर्व सोयी पुरविल्या होत्या. त्यामुळे तो त्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो.
पहिला रुग्ण कसा ट्रेस झाला? उपचार कुठे घेतले
घोडबंदर भागात राहणारा ३५ वर्षीय नागरिक परदेशातून ९ मार्चला भारतात आला. तेव्हा तो जेथून आला होता, त्या देशाचे नाव प्रशासनाच्या यादीत नव्हते. त्याच्यात लक्षणे न दिसल्याने त्याला घरी जाऊ दिले. परंतु, पत्नी, दोन मुलांपासून त्याने दुसऱ्या खोलीत स्वत:लाच क्वारंटाइन केले होते. त्यानंतर, ११ मार्चला त्याने थेट कस्तुरबा रुग्णालय गाठले. तेथे तपासणीत तो पॉझिटिव्ह आला.
कुटुंबात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही
या रुग्णाच्या घरातील दोन मुले आणि त्याच्या पत्नीलाही ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात आणले. त्यांचीही कोविड चाचणी केली. सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. रुग्णाने स्वत: घेतलेल्या खबरदारीमुळेच त्यांच्या घरातील इतर कोणीही पॉझिटिव्ह आले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबाला एक प्रकारे मोठा दिलासा मिळाला.