Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात १७९३ बाधितांसह सर्वाधिक ५० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 11:33 PM2020-07-09T23:33:55+5:302020-07-09T23:37:30+5:30
ठाणे जिल्हयात गुरु वारी कोरोनाच्या एक हजार ७९३ रुग्णांची नोंद झाली. तर ५० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाभर बाधितांची संख्या आता ४८ हजार ८५६ तर मृतांची संख्या एक हजार ४५४ इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कासारवडवली पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या मृत्युमुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांच्या मृत्युची संख्याही पाचवर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हयातील बहुतांश भागात लॉकडाऊन केले आहे. तरीही गुरु वारी २४ तासांमध्ये जिल्ह्यात एक हजार ७९३ कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. तर ५० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाभर बाधितांची संख्या ४८ हजार ८५६ तर मृतांची संख्या एक हजार ४५४ इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी सर्वाधिक ५८० रुग्ण दाखल झाले तर सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या ही दहा हजार ९३१ तर मृत्यूची संख्या १६४ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात ३४८ नवे रुग्ण नोंदविले गेले असून १६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या १२ हजार तर मृतांची संख्या ४६५ वर पोहचली आहे. त्याचबरोबरच नवी मुंबईमध्ये २३९ रुग्ण दाखल झाले. तर नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. इथे आता आठ हजार ५९८ इतकी बाधितांची संख्या झाली असून मृतांची संख्या २७८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १८५ रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आता चार हजार ९९३ तर १७६ इतकी मृतांची संख्या झाली. भिवंडी महापालिका क्षेत्रामध्ये ५१ बाधितांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे दोन हजार ५८३ बाधितांची तर मृतांची संख्या १३४ वर पोहचली आहे. उल्हासनगरमध्ये नव्याने १६४ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने याठिकाणी बाधितांची तीन हजार ४२४ तर मृतांची संख्या ६१ झाली. अंबरनाथमध्ये ५० रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ४२८ तर मृतांची संख्या ८४ वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये ३६ नवे रुग्ण दाखल झाले. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार १९४ तर मृतांची संख्या २० झाली. त्याचप्रमाणे ठाणे ग्रामीण भागात १४० रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूमुळे बाधितांची संख्या दोन हजार ७३२ तर मृतांची संख्या ७२ वर पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...........................
* आयुक्तालयात आणखी एका पोलिसांचा गेला बळी
ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यातील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोनावरील उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आयुक्तालयात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ८ जुलै रोजी दोन अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयातील चौघांना क्वॉरंटाईन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.